बॉलिवूडचा ‘किंग’ अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘चक दे इंडिया’ चित्रपटाला रिलीज होऊन आज १४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अभिनेता शाहरूख खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या चित्रपटातील महिला संघाचे आभार मानले आहेत. ही पोस्ट शेअर करताना शाहरूख खानने स्वतःला ‘गुंडा’ म्हटलंय. त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.
शाहरूख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाला विसरणं अशक्य आहे. आज या चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण झालीत. पण तरीही या चित्रपटासाठीची क्रेझ आजही तशीच आहे. २००७ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात अभिनेता शाहरूख खानने भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधाराची भूमिका साकारली होती. आईला बहिष्कृत केल्यानंतर हरवलेली प्रतिष्ठ परत मिळवण्यासाठी वादग्रस्त भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक बनलेल्या ‘कबीर खान’च्या भूमिकेतून शाहरूखने देशभरातील चाहत्यांचं मन जिंकलं. आज या चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरूखने या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करत चित्रपटातील महिला संघाचे त्याने आभार मानलेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केलीय. यात त्याने स्वतःची एक सेल्फी जोडलीय. त्याने क्लिक केलेल्या या सेल्फीमध्ये त्याचा स्टबल लूक दिसून आला. ही सेल्फी शेअर करत त्याने चित्रपटातील महिला संघासाठी खास संदेश देखील लिहीलाय. यात त्याने लिहिलंय, “चित्रपटात इतका सुंदर अनुभव देण्यासाठी ‘चक दे इंडिया’च्या युवा महिलांचे खूप खूप आभार. @yrf, #MirRanjanNegi, @jaideepsahni, @sudeepdop, @Sukhwindermusic यांच्यासह बाकी सर्वजण चित्रपटात मला गुंडा बनवण्याच्या प्रेमळ प्रयत्नात सामील आहेत.”
View this post on Instagram
अभिनेता शाहरूख खानने त्याच्या या पोस्टमध्ये स्वतःला गुंडा म्हटल्यानं अनेकांनी यावर विचार करण्यास सुरूवात केली. या पोस्टमध्ये त्याने स्वतःला गुंडा असं का म्हटलं असेल, असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडला. पण यामागचं कारण त्याच्या याच चित्रपटात लपलेलं आहे. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात शाहरूखने साकारलेल्या कबीर खानचा एक डायलॉग आहे. “प्रत्येक टीममध्ये एकच गुंडा असतो आणि या टीमचा मी गुंडा आहे.”, असं शाहरूख खान या चित्रपटात म्हणतो. त्यामूळे त्याने ही पोस्ट शेअर करताना त्याच्या चित्रपटातील डायलॉग प्रमाणेच स्वतःला ‘गुंडा’ असं म्हटलंय.
शाहरूख खानने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. त्याच्या या पोस्टवर फक्त त्याचे फॅन्सच नव्हे तर बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटी सुद्धा कमेंट्स करताना दिसून येत आहेत. अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या या पोस्टवर इमोजी शेअर करत कमेंट दिलीय.
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर शाहरूख खानचा ‘चक दे इंडिया’ चित्रपट पुन्हा चर्चेत आलाय. चाहत्यांनी रिअल आणि रील टीमची तुलना करण्यास सुरुवात केलीय.