बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी खान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. मात्र जवळपास तीन आठवडे शाहरुख आणि गौरीच्या चेहऱ्यावर मुलाबद्दलची चिंता स्पष्ट दिसत होती. विशेष म्हणजे या दिवसात त्या दोघांनीही नीट न खाल्ल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, अशी माहिती वकील मुकुल रोहतगी यांनी दिली.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. इतर ठिकाणी देखील हेच चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याला जामीन मिळेपर्यंत अनेकांनी खान कुटुंबाला समर्थन देणारे ट्वीट केले होते. आर्यनला जामीन मिळताच अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

शाहरुखसह गौरीच्या तब्येतीवर परिणाम

पण आर्यन खानला अटक केल्यापासून शाहरुख खान आणि गौरी खान हे प्रचंड चिंताग्रस्त पाहायला मिळत होते. मुकुल रोहतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या अटकेपासून सुनावणीपर्यंत शाहरुख खान हा प्रचंड चिंतेत होता. त्याने त्याचे सर्व प्रोफेशनल प्रोजेक्ट, कार्यक्रम काही दिवसांकरिता रद्द केले होते. तसेच तो आमच्या लीगल टीमसोबत कायम संपर्कात होता. त्याने महिनाभरापासून काहीही नीट खाल्लेलं नाही. तसेच तो दिवस-रात्र फक्त कॉफी प्यायचा. यामुळे शाहरुखच्या चेहऱ्यावर, तब्येतीवर बराच परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Mumbai Drugs Case : आर्यन खानला आजची रात्रही तुरुंगातच घालवावी लागणार का?

विशेष म्हणजे शाहरुख हा इतके दिवस मन्नतऐवजी ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होता. या ठिकाणी मुकुल रोहतगी नेहमी ये-जा करत होते. तसेच गौरी खानच्या तब्येतीवरही यादरम्यान परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १० दिवसांपासून गौरीची तब्येत बिघडल्याचे सांगितलं जात आहे. ती तिच्या जवळच्या नातेवाईंकाशी बोलत असताना नेहमी रडायची, असेही मुकुल रोहतगी म्हणाले.

आर्यन खानला जामीन ; उच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजूर केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी सायंकाळपर्यंत देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर रोख रकमेवर आर्यनची सुटका करण्याची विनंती रोहटगी यांनी केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे नमूद केले.