चार वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये शाहरुख खानचा झिरो चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याआधी त्याचे ‘जब हॅरी मीट सेजल’, ‘फॅन’ असे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकले नाही. ‘झिरो’ फ्लॉप झाल्यानंतर पुढची चार वर्ष शाहरुखचा एकही चित्रपट आला नाही. गेली तीन-चार वर्ष शाहरुखसाठी फारशी चांगली नव्हती. असे असले तरी, आर. माधवनच्या ‘रॉकेटरी’मध्ये आणि आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये तो झळकला. शाहरुख अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्येही असल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या वर्षी त्याचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
तब्बल चार वर्ष ब्रेक घेतल्यानंतर शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाच महिन्यापूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. या व्हिडीओवरुन चित्रपटामध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम असे कलाकार दिसणार असून टिझरमधून ‘पठाण’ हा अॅक्शनपट असल्याचे समजते. जून महिन्यात शाहरुखचा लूक असलेले मोशन पोस्टर शेअर केला गेला. त्यानंतर महिन्याभराच्या आत दीपिका पदुकोणचे पात्राचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. आज जॉन अब्राहमचे मोशन पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले. मोशन पोस्टरनंतर आता काही दिवसात ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा- ‘राम तेरी गंगा मैली’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनवर ३७ वर्षांनंतर मंदाकिनी यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…
जॉनने चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्या व्यक्तिरेखेची थोडक्यात माहिती दिली आहे. मोशन पोस्टरची सुरुवात एका टाईम बॉम्बच्या फुटण्याने होते. बॉम्ब फुटल्यानंतर जॉनचा लूक पाहायला मिळतो. पांढरा लांब हाताचा टी-शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट असे कपडे त्याने घातले आहेत. जॉनच्या हातामध्ये बंदूक आहे. तो एखाद्या गॅरेजसारख्या ठिकाणी असून त्याच्या आजूबाजूला आग लागली असल्याचे दिसते.
आणखी वाचा- “मी पुरस्कार विकत घेतला याची मला लाज वाटते” जेव्हा शाहरुख खानने दिली होती आपल्या चुकीची कबुली!
२५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या पठाण सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर यशराज प्रोडक्शनच्या आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या सुरू असलेल्या बॉयकॉटच्या मुद्द्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण जॉन अब्राहमच्या मोशन पोस्टरमुळे या अफवा संपुष्टात आल्या आहेत. मात्र चित्रपटाच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड सोशल मीडियावर अद्याप सुरूच आहे.