टी-२० क्रिकेट विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत विश्वचषकाच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. त्यानतंर आता पाकिस्तानबरोबर अंतिम फेरीत कोण भिडणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. हा सामना अॅडलेड क्रिकेट मैदानावर दुपारी १:३० वाजता सुरु होईल. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर अनेक जुने फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यातच शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सध्या करोडो भारतीयांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत करून भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना व्हावा, अशी इच्छा तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे. त्यातच रेड चिलीज एंटरटेनमेंटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे.
आणखी वाचा : IND vs ENG 2nd Semi Final Live: इंग्लंडने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

या व्हिडीओत अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच शाहरूख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पडुकोण, सोनु सूद , बोमन इरानी हे देखील दिसत आहे. हा सीन ते सर्वजण मंचावर डान्स करायला जाण्यापूर्वीचा आहे. त्यावेळी दीपिका ही त्या सर्वांचा उत्साह वाढवताना दिसत आहे.

रेड चिलीजने व्हिडीओ शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील आजचं वातावरण’ असे म्हणतं त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर #INDvsENG #T20IWorldCup2022 #Semifinals #HappyNewYear #RedChilliesEntertainment असे हॅशटॅग शेअर केले आहेत.

दरम्यान २०१४ मध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत दोन टी-२० सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड २२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने १२ सामने जिंकले, तर इंग्लंडच्या संघाने १० सामने जिंकले आहेत.