बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

शरद पवार रविवारी दुपारी दिलीप कुमार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. “आज खार हिंदुजा रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल असलेले जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच, जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. दिलीप कुमार यांची प्रकृती लवकर बरी होऊ दे यासाठी मी प्रार्थना करतो”, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

या आधी दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. सायरा बानू यांनी ‘आजतक’ला मुलाखत दिली. त्यावेळी दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘दिलीप साहब यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे आम्ही खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना घेऊन गेलो. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. इथे आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती का बघडली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.’

आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

पुढे त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे रुग्णालय नॉन कोविड आहे आणि त्यांना करोना झालेला नाही. आम्ही लवकरच घरी परत जाऊ. डॉ. नितीन गोखले आणि त्यांची संपूर्ण टीम दिलीप साहब यांची काळजी घेत आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही दोघांनीही करोना लस घेतली आहे.’