Shilpa Shirodkar on Bollywood’s biggest pranksters : शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, जिने गोविंदा, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ व मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या सुपरस्टार्सबरोबर काम केले.

शिल्पाने रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. परंतु, काही चित्रपटांनंतर तिने अचानक चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

चित्रपटांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनल्यानंतर, शिल्पा शिरोडकर लाइमलाइट आणि चित्रपटांपासून दूर गेली. ती लग्नानंतर तिचा पती अपरेश रणजितबरोबर परदेशात स्थायिक झाली. आता अलीकडेच शिल्पा शिरोडकरने तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

शिल्पा शिरोडकर पिंकव्हिलाशी बोलताना म्हणाली, “माझ्याकडे इंडस्ट्रीतील लोकांच्या खूप सुंदर आठवणी आहेत. त्याची सुरुवात अमितजींपासून होते, ज्यांनी मला शिस्त आणि वेळेवर येण्याचं महत्त्व शिकवलं. एके दिवशी आम्ही एका अ‍ॅक्शन सीनचे चित्रीकरण करीत होतो आणि ते म्हणाले, ‘माझ्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक जहाजाच्या कॅप्टनसारखा आहे. तो जे काही सांगेल, ते मी करेन.’ त्यांनी कधीही कोणालाही असे वाटू दिले नाही की, ते ‘बिग बी’ आहेत. मी ‘हम’च्या सेटवर एका डान्स सीनचे चित्रीकरण करीत होते आणि माझा अपघात झाला. मी एक आठवडा चालू शकत नव्हते आणि अमितजींनी मला सुंदर फुले पाठवली. ती पाहून मला खूप आनंद झाला.”

रजनीकांत मराठी बोलत असत : शिल्पा शिरोडकर

रजनीकांत यांचे कौतुक करत शिल्पा म्हणाली की, ते तिच्याशी अनेकदा मराठी भाषेत बोलत असे. शिल्पाने सांगितले की, अक्षय कुमार आणि अजय देवगण खूप खोडकर असायचे. ती म्हणाली, “अजय विनोद करण्यात खूप तज्ज्ञ आहे. आम्ही शिमलामध्ये शूटिंग करीत होतो, त्याने हॉटेलमध्ये एका भुताची कथा रचली. मध्यरात्री कोणीतरी माझा दरवाजा ठोठावला, मी माझ्या पालकांसह आणि हेअर ड्रेसरसह खोलीत होते. लोक पांढरी बेडशीट घालून लॉबीमध्ये धावत होते आणि आम्हाला सकाळी कळले की, तो अजय देवगण होता.”

अक्षय घड्याळ चोरायचा : शिल्पा शिरोडकर

शिल्पा अक्षयच्या खोड्यांबद्दलही बोलली. ती म्हणाली, “अक्षय लोकांची घड्याळे चोरायचा आणि लपवायचा. तो कोणाचे तरी घड्याळ गायब करायचा आणि नंतर मला त्यांना वेळ विचारायला सांगायचा. मी त्या खोड्यांचा भागही नव्हते. जेव्हा ती व्यक्ती काळजीत पडायची आणि घड्याळ शोधायला सुरुवात करायची तेव्हा मीही गोंधळून जायचे. लोक वेडे व्हायचे आणि शूटिंगला उशीर व्हायचा; पण मजा यायची.”

शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केले आणि ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले. तिच्या शानदार चित्रपटांमध्ये ‘हम’, ‘आँखें’, ‘गोपी-किशन’ व ‘खुदा गवाह’ यांसारखे हिट चित्रपट समाविष्ट आहेत. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर बॉलीवूड सोडले आणि ती परदेशात स्थायिक झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.