‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा दाखल झाली आहे. शिवानी घरात परतल्यापासून सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा आहे. घरातील तिचा वावर पाहता शिवानी सुरुवातीपासूनच विशेष चर्चेत होती. ‘वूट’वरील अनसीन अनदेखाच्या व्हिडीओत शिवानी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत हिना पांचाळशी गप्पा मारताना दिसतेय.
‘तू खूप धाडसी आहेस. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर सोशल मीडियावरील टीकांना कसं सामोरं जायचं हाच माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे,’ असं हिना शिवानीला म्हणते. त्यावर शिवानी तिचं बेधडक मत मांडते. ‘सोशल मीडियावर ट्रोल करणारी सर्वाधिक ११वी, १२वीची मुलं असतात. मी त्यांच्या टीकांचा इतका विचारच करत नाही. स्वत:पेक्षा मी कोणालाच जास्त महत्त्व देत नाही. माझं स्वत:वर खूप प्रेम आहे. त्यामुळे कोण मला काय म्हणतं याचा विचार मी फार करत नाही,’ असं शिवानी सांगते.
ट्रोलिंगबद्दल बोलताना हिना भावूक होते. ‘माझं करिअर फार मोठं नाही. पण मी जे काही केलंय त्यावर मला अभिमान आहे,’ असं म्हणताना हिनाला अश्रू अनावर होतात. शिवानी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.
शिवानीच्या परत येण्याने घरात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काहींना तिची मैत्री आवडली आहे तर काहींना ती नकोशी आहे. तिचा हा प्रवास कुठपर्यंत असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.