अभिनेता श्रेयस तळपदे हा मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख टिकवून आहे. त्याने ‘इक्बाल’, ‘डोर’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘हाऊसफुल २’ अशा बऱ्याच बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं. तो आता नाईन रस हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

त्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तो म्हणाला,” ‘नाईन रस’ हा प्लॅटफॉर्म फक्त परफॉर्मिंग आर्ट्ससाठी असलेला पहिला वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये ज्या गोष्टी रंगमंचावर सादर केल्या जातात, त्या सर्व म्हणजे नाटकं, नृत्य, गायन, स्टँडअप अशा सर्व गोष्टी दाखवल्या जातील. देशभरातले सर्व प्रकारचे सादरीकरण या प्लॅटफॉर्मवर केले जाईल.”

याबद्दल बोलताना श्रेयस आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये रमला. आपण पाहिलेलं पहिलं नाटक आणि सादर केलेलं नाटक याबद्दलही तो बोलला. आपल्या पहिल्या नाटकात आपण सीतेची भूमिका साकारल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे त्याने सुरुवातीच्या काळात द्रौपदीची भूमिकाही साकारली होती. डोर आणि इक्बाल या चित्रपटानंतर त्याला विनोदी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळू लागली आणि काही काळानंतर त्याच्यावर विनोदी अभिनेता असा शिक्काच लागला.

याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी एका विनोदी चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मात्र माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिका गंभीर असल्याने प्रेक्षक मला विनोदी भूमिकेत स्वीकारणार नाहीत असं त्या दिग्दर्शकाचं मत असल्याने त्याने मला त्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी दिली नाही. त्यानंतर मला गोलमालसाठी विचारणा करण्यात आली. मी ती स्वीकारली आणि त्यानंतर मग मी नकळत विनोदी चित्रपट करत गेलो आणि मग माझ्यावर विनोदी अभिनेता हा शिक्का बसला. मी आजही अशा स्क्रिप्ट्सच्या शोधात आहे, ज्यामुळे माझ्यातल्या अभिनेत्याला एक आव्हान मिळेल. मला आता कसली खंत नाही. पण माझ्यातलं टॅलेंट अजूनही नीट समोर यायचं आहे. यापेक्षाही खूप काही चांगलं मी करू शकतो. पण सध्या मी माझं काम एन्जॉय करत आहे.”

श्रेयसने ल़ॉकडाऊनच्या काळातली कलाक्षेत्राची परिस्थिती आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सची होणारी भरभराट आणि वाढलेली मागणी पाहता ‘नाईन रस’ हा परफॉर्मिंग आर्ट्ससाठीचा प्लॅटफॉर्म सुरु केला.