२२ एप्रिल रोजी झालेल्या काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात रविवारी (१८ मे) तिरंगा यात्रा काढण्यात आली.

पुण्यातील या तिरंगा यात्रेत मराठी अभिनेत्री स्नेहल तरडे हीदेखील सहभागी झाली होती. याबद्दलचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री या तिरंगा यात्रेत मैत्रिणींसह सहभागी झाली होती. याचा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, “भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख, भिकारड्या पाकड्याचा राग आणि दहशतवादी ठेचल्याचा आनंद अशा संमिश्र भावना सोबत बाळगून या यात्रेत मैत्रिणीसह सहभागी झाले.”

यापुढे स्नेहलने “भारत माता की जय! भारतीय सैन्यदलाचा विजय असो!” अशा घोषणाही दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये तिचं कौतुक केलं आहे तिच्या या समाजभानाबद्दल स्तुती केली आहे. अनेक चाहत्यांनी “तुम्ही तरुणांसाठी आदर्श आहात”, “जय हिंद”, “वंदे मातरम्” अशा कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओत ती भर पावसात हातात फलक घेऊन चालतानाचे दिसत आहे. तसंच तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये समस्त पुणेकरांनी यात्रेसाठी केलेली गर्दीही पाहायला मिळत आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या तिरंगा यात्रेची ज्ञानेश्वर पादुका चौकात सभेने सांगता झाली. या यात्रेत अनेक राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर स्नेहलने पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला होता. “मला उघडपणे बोलायचं आहे. खूप एकांतात शिव्या देऊन मन शांत होणार नाही” अशी पोस्ट शेअर केली होती. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने “त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही केवढी खेदाची बाब आहे” असंही म्हटलं होतं. अशातच आता तिने तिरंगा यात्रेत सहभाग घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.