Sonakshi Sinha On Zaheer Iqbal : आठ वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी सिन्हाने २०२४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर आंतरधर्मीय विवाह केला. वेगळ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल अभिनेत्रीला खूप ट्रोलही करण्यात आले. या सगळ्यात सोनाक्षी सिन्हाने आता एका मुलाखतीदरम्यान झहीर इक्बालबरोबरच्या तिच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल उघडपणे सांगितले आहे.

‘द राईट अँगल विथ सोनल कालरा’ या मुलाखतीत, सोनाक्षीने त्यांच्या नात्यात धर्म कधी आला आहे का यावर चर्चा केली. ती म्हणाली, “आम्ही एक कपल आहोत, आम्ही घरी कसे राहतो, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कसे वाढलो, त्यानुसार काही प्रथा आहेत, ज्याचे तो आणि त्याचे कुटुंब पालन करतात; ज्यांचा मी खरोखर आदर करते.

सोनाक्षी पुढे म्हणाली, “मी आणि माझे कुटुंब काही रीतीरिवाज पाळतो, ज्यांचा ते आदर करतात. धर्म ही अशी गोष्ट आहे जी आमच्यात कधीही येणार नाही. त्याबद्दल कधीही कोणताही प्रश्न, भांडण किंवा तणाव निर्माण झाला नाही आणि मला वाटते की तीच सर्वात सुंदर गोष्ट आहे.”

झहीरचे सोनाक्षीच्या आई-वडिलांशी कसे संबंध आहेत?

सोनाक्षीचे आई-वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्याशी असलेल्या झहीरच्या संबंधांबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “जेव्हा जेव्हा तो येतो तेव्हा सगळे जण ‘झहीर येतोय, जावई येतोय’ असे म्हणत धावतात. माझी आई सतत विचारत असते की तो काय खाणार आहे आणि माझ्या वडिलांना त्याच्याबरोबर वेळ घालवणे आवडते. मला वाटते की ते खूप चांगले मित्र झाले आहेत. मी खोलीत प्रवेश केल्यावर ते सहसा गप्पा मारत असतात आणि मी शांत बसते.”

सोनाक्षी दोघांच्या नात्याबद्दल म्हणाली, “आपण म्हणतो की आपल्याला अशी एखादी व्यक्ती शोधायची आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला म्हातारे व्हायचे आहे. पण, झहीरसारख्या व्यक्तीबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला जाणवते की तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे, ज्याच्यासमोर तुम्ही लहान मुलासारखे वागू शकाल. त्यामुळेच मजा चालू राहते. तुम्ही सतत हसत राहता. माझ्या आयुष्यात मला ती गोष्ट कमी पडत होती. आता ती आली आहे, त्यामुळे मी यापेक्षा जास्त आनंदी होऊ शकत नाही.”

सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच सुधीर बाबूबरोबर ‘जटाधरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवी प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झाशी, राजीव कनकला आणि सुभलेखा सुधाकर यांच्याही भूमिका आहेत.