मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ही ‘अप्सरा’ झळकली. मोहनलाल अभिनीत लिजो जोस पेलिसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टई वलीबन’ २५ जानेवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला आहे.

सोनाली म्हणाली, जेव्हा तिने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी होकार दिला, त्यावेळी ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपट संकल्पनेच्याही पलीकडचा बनेल याचा तिला अंदाजही नव्हता. मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर साम्य आहे. तसेच दोघांचे प्रेक्षकदेखील समान आहेत. आपल्या संस्कृतीतील कला, साहित्य, भावना यांची ओळख करून देणारे चित्रपट या दोन्ही सिनेसृष्टीत बनवले जातात. वास्तवावर आधारित आणि जागतिक समस्यांवर केंद्रित तसेच सर्वांना जोडणारे, अतिशय जवळचे वाटणारे अशी ओळख या दोन्ही सिनेसृष्टींची आहे.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ मल्याळम चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

या चित्रपटात मोहनलाल यांच्यासारख्या ग्रेट लोकांबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल, तसेच या चित्रपटात आणि ‘नटरंग’मधील साम्याबद्दल सोनालीने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे. ‘डीएनए’शी संवाद साधतांना सोनाली म्हणाली, “लिजो जोस पेलिसरी यांना मला या चित्रपटात घ्यावसं वाटलं त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अप्सरा आली हे गाणं. माझी दक्षिणेतील भागात फारशी ओळख नसल्याने सुरुवातीला मला शोधणं त्यांना फार कठीण गेलं.”

पुढे चित्रपटात काम करण्याबद्दल आणि त्यातील कथेबद्दल भाष्य करताना सोनालीने ‘नटरंग’ या चित्रपटाची अन् त्यातील पात्राची आठवण काढली. सोनाली म्हणाली, “माझ्यासाठी हा अनुभव अगदी ‘नटरंग २.०’ करण्यासारखाच होता. वलीबन आणि नटरंगच्या कथेत बरीच साम्य तुम्हाला पाहायला मिळतील. ‘मलाइकोट्टई वलीबन’ हा चित्रपट एका काल्पनिक काळातगावोगावी जाऊन कला सादर करण्याबद्दल आहे, यातील नृत्यातही तुम्हाला विविध प्रकार पाहायला मिळतील. शिवाय रंगा राणी हे पात्र अत्यंत सुंदर, ताकदवान आणि नाट्यमय आहे. माझी वेशभूषादेखील नऊवारीसारखीच आहे. लिजो यांच्या नजरेत माझं पात्र हे भारतीय लोक कलेचं प्रतिनिधित्व करणारं होतं.”

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहनलाल यांच्याबरोबर काम करण्याबद्दल सोनाली म्हणाली, “चित्रपटात माझे आणि मोहनलाल यांचे बरेच सीन्स आहेत. या दोन पात्रांमधील केमिस्ट्री फारच धमाल, मजेशीर आहे. मोहनलाल यांच्याबरोबर काम करण्याचा एकूण अनुभवच अविस्मरणीय होता. जैसलमेर मध्ये चित्रित झालेला अॅक्शन सीन मी कधीच विसरणार नाही. काही तांत्रिक कारणांमुळे त्या सीनसाठी बरेच रीटेक घ्यावे लागले होते, पण मोहनलाल हे एकमेव कलाकार आहेत जे दिग्दर्शकाला जसं हवंय तसं काम मिळण्यासाठी रीटेक देत होते. या वयातही ते आज स्वतःचे स्टंट स्वतः करतात ही गोष्ट प्रेरणादायी आहे.”