अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर ‘आग’ (१९९४)मधून तिने अभिनयात पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, तिने १९९६ मध्ये ‘दिलजले’द्वारे आपली ओळख निर्माण केली. सोनालीने २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ या मराठी चित्रपटात ‘छम छम करता’ हे आयटम साँग केले होते.
२००४ मध्ये आलेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या मराठी चित्रपटातील ‘छम छम करता’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ती गर्भवती असल्याची माहिती तिला नव्हती, असे बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सांगितले. सोनाली बेंद्रेने डान्स कोरिओग्राफर फराह खानशी झालेल्या संभाषणात याबद्दल सांगितले. फराह खान सध्या वेगवेगळ्या सेलिब्रिटींबरोबर व्लॉगिंग करीत आहे आणि ती सोनाली बेंद्रेबरोबर काश्मिरी गुच्ची पुलाव बनवत असताना तिने ही माहिती दिली.
मला माहीत नव्हते की, मी गर्भवती आहे : सोनाली
फराह खान म्हणाली, “सोनाली, आपण एकत्र अनेक गाणी केली आहेत. आम्ही ‘आँखों में बसे हो तुम’, नंतर ‘डुप्लिकेट’ आणि नंतर ‘छम छम करता’ हे मराठी गाणे केले.” त्याच संभाषणादरम्यान सोनाली बेंद्रे म्हणाली, “जेव्हा मी त्या गाण्याचे शूटिंग करत होते तेव्हा मला माहीत नव्हते की, मी गर्भवती आहे.” फराह खानने सोनाली बेंद्रेचे कौतुक केले.
यादरम्यान, फराह खानने सांगितले की, त्यावेळी सोनाली जाड होती आणि ती एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी दिसत होती. त्यावर सोनाली म्हणाली, “फराह मला सांगत होती की, तू एका पंजाबीशी लग्न केले आहेस. तू गोल्डीच्या घरी जेवण करीत आहेस. नंतर मला कळले की, मी गर्भवती आहे. मला याबद्दल माहीत नव्हते.” यावर फराहने सांगितले की, सोनालीने गरोदरपणातही संपूर्ण डान्स शूट केला होता. सोनाली पुढे म्हणाली की फराहबरोबर काम करणे नेहमीच सोपे होते. २००२ मध्ये सोनाली बेंद्रेने निर्माता गोल्डी बहलशी लग्न केले. २००५ मध्ये सोनालीने एका मुलाला जन्म दिला.