Sonu Sood rescues snake in Mumbai society : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या नजरेत हिरो बनला आहे. त्याने त्याच्या सोसायटीत दिसणारा साप स्वतःच्या हातांनी पकडलाच नाही तर त्याला वाचवलेही.
यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत नव्हती. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. सापाला पकडताना सोनू म्हणतो की मला तो कसे पकडायचे हे माहीत आहे, म्हणून मी तो पकडला. पण, याबरोबरच त्याने चाहत्यांना एक संदेशही दिला आहे.
सोनू सूदने १९ जुलै रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तो म्हणत आहे की, हा आमच्या सोसायटीत आला होता. हा एक रॅट-स्नेक आहे. हा बिनविषारी आहे. पण, साप आला तर काळजीपूर्वक वावरलं पाहिजे. काहीवेळा साप आपल्या सोसायटीमध्ये येऊ शकतो, तर संबंधित प्रोफेशनल लोकांना बोलवलं पाहिजे. मला पकडायला येतंय, म्हणून मी पकडला आहे, पण आपण काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
व्हिडीओमध्ये पुढे सोनूने सापाला काळजीपूर्वक उशीच्या कव्हरमध्ये ठेवले आणि त्याच्या मदतनीसांना तो जवळच्या जंगलात सोडण्याची सूचना केली. सोनूच्या कामाचे कौतुक केले जात आहे. चाहते त्याला खरा हिरो म्हणत आहेत.
चाहत्यांनी केले सोनू सूदचे कौतुक
एकाने म्हटले, ‘सोनू सूद सरांनी आज काहीतरी वेगळे केले आहे. जिथे लोक साप पाहून पळून जातात, तिथे सोनू सूदने स्वतःच्या हातांनी जिवंत साप पकडला आणि लोकांना दाखवला. अगदी खऱ्या हिरोसारखे. तुम्ही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करू नका. तुम्ही खऱ्या आयुष्यात हिरो आहात! चित्रपटांमध्येही हिरो व्हा.पण काही वापरकर्ते त्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देत आहेत. एकाने म्हटले, ‘सर, असा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. थोडी सावधगिरी बाळगा, स्वतःची काळजी घ्या.’ दुसरा म्हणाला, ‘भाईसाब, तुम्ही आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात, कृपया सावधगिरी बाळगा, पुन्हा असा धोका पत्करू नका.’
यापूर्वी सोनूने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील हडोलती गावातील ७६ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांना मदत केली होती. अंबादासकडे पैसे नसल्याने तो बैल खरेदी करू शकत नव्हता आणि तो हाताने शेत नांगरत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने अभिनेत्याचे लक्ष वेधून घेतले. त्याने तो व्हिडीओ त्याच्या एक्स हँडलवर शेअर केला आणि लिहिले, ‘तुम्ही नंबर पाठवा, आम्ही बैल पाठवतो.’
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सोनू शेवटचा ‘फतेह’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. यात नसीरुद्दीन शाह, जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आणि दिव्येंदु भट्टाचार्य देखील होते. तो ‘माधा गज राजा’ या तमिळ अॅक्शन-कॉमेडी चित्रपटातही दिसला होता, ज्यामध्ये विशालदेखील त्याच्याबरोबर होता.