सातत्याने वेगळे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. येत्या शनिवारी, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. या दोन्ही मालिकांच्या कथानकात एक महत्त्वाचं वळण येणार आहे.
‘नकळत सारे घडले’ मधले प्रताप, नेहा आणि परी फिरायला बाहेर जातात. तिथं त्यांची भेट ‘शतदा प्रेम करावे’ मधल्या उन्मेष आणि सायली यांच्याबरोबर होते. उन्मेष आणि सायली यांच्यातल्या नात्याला प्रेमाची किनार मिळते आहे. नेहा आणि उन्मेष यांची कॉलेजपासूनची ओळख असते. त्यामुळे रिसॉर्टवर भेटीदरम्यान या दोन्ही जोडप्यांच्या बऱ्याच गप्पा होतात.
मात्र, त्या दरम्यान अशी एक घटना घडते, की त्यानं नेहाला धक्का बसतो. ती घटना काय असते, त्यातून पुढे काय घडतं, उन्मेष आणि सायली त्या परिस्थितीत काय करतात, त्यांच्या आयुष्याला काही वेगळं वळण मिळतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तर महासंगमच्या भागात मिळणार आहेत. ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन मालिका एकत्र आणून त्याची एक कथा गुंफण्याचा हा अभिनव प्रयोग नक्की पाहा येत्या शनिवारी, ७ एप्रिल रोजी सायं. ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!