Actress recalls facing harassment: चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक अभिनेत्रींना अन्यायाला सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांचे शोषण केले जाते. काही जणींबरोबर कास्टिंग काऊचचे प्रकार घडल्याचे अनेक अभिनेत्री विविध मुलाखतींमध्ये सांगतात.

आता मल्याळम अभिनेत्री सुमा जयरामने तिचा अनुभव सांगितला. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका दिग्दर्शकाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले. ९० च्या दशकात जर अभिनेत्री तडजोड करण्यासाठी तयार नसल्या, तर त्यांना कामाच्या संधी गमवाव्या लागत, कोणत्याही चर्चेशिवाय भूमिका कमी केल्या जात, बदलल्या जात.

“आता इंडस्ट्रीमध्ये अनेक…”

सुमा जयरामने माइलस्टोन मेकर्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत महिलांसाठी इंडस्ट्री असुरक्षित होती, असे वक्तव्य केले. ती म्हणाली, “९० च्या दशकात इंडस्ट्री आजसारखी नव्हती. आता ‘मी टू’सारख्या चळवळी उभ्या राहिल्या आहेत आणि आता इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण, त्या काळात इंडस्ट्री फार वेगळी होती.”

“मोठ्या प्रमाणात त्याग केले जात असत. जर तडजोड केली नाही, तर कित्येक संधी तुमच्या हातातून निघून जात असत. कोणी काहीच बोलत नसे. कारण- प्रत्येकाचं कुटुंब असतं. आजही जे अशा गोष्टींबाबत उघडपणे बोलतात, त्यांच्या हातातून काम निघून जात असे.”

सुमा जयरामने तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “मी एका खूप लोकप्रिय असणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर शूटिंगसाठी गेले होते. माझी आई माझ्याबरोबर होती. एका आठवड्यासाठी शूटिंग होणार होते. सकाळचे शूटिंग झाल्यानंतर संध्याकाळी मी माझ्या खोलीत गेले. १० वाजण्याच्या सुमारास तो दिग्दर्शक दारूच्या नशेत माझ्या खोलीबाहेर आला आणि दरवाजा वाजवू लागला. जेव्हा आम्ही खिडकीतून पाहिले, तेव्हा तोच असल्याची आमची खात्री पटली. तो पूर्ण नशेत होता.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी त्यावेळी १६-१७ वर्षांची होते. थोडा वेळ त्यानं दरवाजा वाजवला आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी शूटिंगदरम्यान तो शिवीगाळ करीत होता. अशा अनुभवांमुळे लोक गप्प राहण्याचा निर्णय घेतात.

सुमा जयराम असेही म्हणाली, जेव्हा तडजोड करण्यास नकार दिला जात असे तेव्हा आपली भूमिका मोठी असेल तरी ती लहान केली जात असे. त्यामुळे माझे दोन सीनच चित्रपटात घेतले जात असत. त्यामुळे मला फक्त लहान भूमिकाच मिळाल्या.