छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेले १३ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शो मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. जेठालालाची भूमिका साकाराणाऱ्या दिलीप जोशी यांचे आज घराघरात नाव झाले आहे. दिलीप जोशी यांनी १९८९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सूरज बडजात्यांची ‘मैंने प्यार किया’ हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात जरी भूमिका छोटी असली तरी ती लक्षवेधी होती.

त्यानंतर दिलीप जोशीं सब वाहिनीवरील ‘तारक मेहता…’ मधील ‘जेठालाल’ भूमिकेतून लाखों प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. पण जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी एकेकाळी अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता. एका जुन्या मुलाखतीत जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनी याचा खुलासा केला. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत जेठालाल हे त्यांच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल बोलत आहेत. ही मालिका त्यांना कशी मिळाली याचा किस्सा त्यांनी या मुलाखतीत शेअर केलाय.

दिलीप जोशींनी सांगितले की “ही कथा ऐकताच मला प्रचंड आवडली. निर्माते असित मोदींनी माझा विचार चंपकलाल आणि जेठालाल या दोन पात्रासाठी केला होता”. यावेळी दिलीप जोशींनी चंपकलालच्या भूमिकेसाठी नकार देऊन जेठालालची भूमिकेसाठी प्रयत्न करतो असे निर्मात्यांना सांगितले. दिलीप जोशी यांना ते जेठालालची भूमिका साकारू शकतील असा विश्वासच नव्हता मात्र निर्मात्यांनी दिलीप जोशींवर विश्वास दाखवला.. त्यांना धीर दिला. अशा प्रकारे जेठालालची भूमिका मिळाल्याचं दिलीप जोशी सांगितलं.


सास बहूच्या मालिकांच्या काळात त्यांना ही अनोखी कन्सेप्ट घेऊन लोकांचे मनोरंजन करायचे होते. दिलीप जोशी त्यांच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल बोलताना म्हणाले “तारक मेहता मालिकेच्या आधी जवळजवळ एक वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हते, मी ज्या मालिकेत काम करत होतो ती मालिका देखील बंद झाली होती. एक क्षण असा होता जेव्हा मी हे क्षेत्र सोडायचा विचार केला होता. पण तारक मेहतामुळे मी या क्षेत्रात अजूनही आहे” असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. तारक मेहता ही मालिका ‘दुनिया ने उधाण चष्मा’ या कॉलमवरुन प्रेरित आहे. या मालिकेचा पहिला भाग २८ जुलै २००८ रोजी प्रदर्शित झाला होता.