अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ संथपणे गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून अतर जिल्ह्यांध्येही मोठं नुकसान झालं आहे. लवकरच हे वादळ गुजराच्या किनारपट्टीवर धडकणार असून हे वादळ धडकण्याआधी ते अति तीव्र स्वरूपाचं असेल. गुजरातच्या अनेक भागात जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली आहे.

तौते वादळ गुजरातमध्ये धडकण्याआधीच त्याचा फटका लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है” च्या सेटला बसला आहे. मुंबईत लॉकडाउनमुळे शूटिंग बंद झाल्यानंतर गुजरातमधील सिलवासामध्ये अनेक मालिकांचं शूटिंग सूरु करण्यात आलंय. मात्र आता तौते चक्रीवादळाचा फटका या शूटिंगलाही बसला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर जोरदार वारे वाहू लागल्याने एकच गोंधळ उडाला. तुफान वारा आणि पावसाच्या हजेरीने सगळ्यांची पळापळ सुरू झाली. सेट वरील क्रू मेंबर तातडीने सर्व साहित्य गोळा करू लागले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखारत झालेली नाही.

इन्स्टाग्रामवर करण कुंद्राच्या एका फॅन क्लबने सेटवरील हा व्हिडीओ शेअर केलाय. वादळ आल्याने सेटवरील क्रू मेंबर पळा पळा म्हणत आहेत. करण कुंद्राने त्याच्या इन्स्टास्टोरीला हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.

वाचा: तौते चक्रीवादळामुळे गोव्यात मोठं नुकसान; फोटो शेअर करत अभिनेता राजीव खंडेलवाल म्हणाला..

चक्रीवादळाचा गुजरातला मोठा फटका बसणार

हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग १५० ते १६० किमी प्रती तास इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वादळामुळे गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, पोरबंदर, जुनागढ, भावनगर, अहमदाबाद, सुरत, वलसाड, अमरेली, आनंद आणि भरुच या १२ जिल्ह्यांबरोबरच दिवमध्येही मोठ्याप्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे.