‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने अनघा ही भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर अश्विनीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनयाप्रमाणेच ती तिची सामाजिक बांधिलकी सुद्धा आवर्जून जपते. सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत अश्विनीने एक खास प्रसंग तिच्या चाहत्यांना सांगितला आहे.

नानांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे अश्विनीचं आयुष्य कसं बदललं, तिच्या विचारांमध्ये काय बदल झाला याबद्दल अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत एक आठवण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन? ‘तो’ प्रोमो पाहताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

अश्विनी महांगडेची पोस्ट

३ ते ४ वर्षापूर्वींची गोष्ट…

माझ्याबरोबर इव्हेंटसाठी बऱ्याचदा नाना यायचे. एका कार्यक्रमाला गेलो आणि तिथे आलेल्या महिलांनी फोटो-फोटो करत धरपकड सुरू केली. कोणी एकीकडे ओढते, तर कोणी दुसरीकडे. बरं अशा कार्यक्रमांमध्ये महिला असतील तर पुरुष आत शिरत नाहीत. मला समजेना या गोंधळात माझी मदत कोणीच का करेना. नानामध्ये शिरले आणि मला बाजूला घेतले. नंतर मात्र ग्रुप करून सगळ्यांना फोटो देऊन मी गाडीत बसले. डोकं दुखायला लागलं, चिडचिड झालेली, दमलेले.

नानांनी मला शांत होऊ दिलं आणि मग माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मला म्हणाले ताई, तुझा कार्यक्रम असेल तर आजूबाजूच्या महिलांना साधारण १० दिवस आधी समजतं की, आपल्याकडे अश्विनी महांगडे येणार आहे. असं समज की तुझे फ्लेक्स पाहून एका महिलेला समजले की तू येणार आहेस तर ती १० दिवस आधीच मनात स्वप्नं पाहायला लागते की, मी कार्यक्रमाला जाणार. मग शेजारच्या बाईला सांगत असेल की, तू येणार आहेस. मग त्यांची चर्चा होत असेल की साडी कोणती नेसायची, लवकर गेलो तरच पुढे खुर्ची मिळेल त्यामुळे लवकर जायचे. कारण तिला तुला भेटायचे असते #कलाकार आहेस म्हणून…जसं जसा तो दिवस जवळ येत असेल ती महिला मनात ठरवत असेल की १ फोटो तर घेणारच मी.

शेवटी कार्यक्रमाचा दिवस उजाडत असेल. कार्यक्रम संध्याकाळी असतो, कार्यक्रम संपवून घरी जायला, जेवण बनवायला उशीर झाला तर नवरा, मुलं, सासू सासरे उपाशी. मग ती जण्याआधी भाजीची सगळी तयारी करून ठेवत असेल किंवा भाजी, भात करून घरी आल्यावर भाकरी करू मग होईल पटकन असा विचार करून, घरातले सगळे आवरून, स्वतः छान तयार होऊन, तू पोहोचण्याआधी किमान २ तास लवकर जाऊन जागा पकडून बसत असेल. फक्त तुला ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि एका फोटोसाठी.

हा एवढा १० दिवसांचा प्रवास तिने आनंदाने केला, स्वप्नं पाहिली. आपण कलाकार म्हणून किमान तिचे ते स्वप्नं पूर्ण नाही का करू शकत??
बापरे…एवढा विचार मी कधीच केला नाही. पण नानांनी मला एका सुंदर गोष्टीतून सत्य समजून सांगितले.
त्यानंतर जेवढे कार्यक्रम झाले, लग्नासाठी कुठे गेले तरी मी तिथे आलेल्या महिलांना त्यांना हवा तेवढा वेळ दिला आणि फोटो सुद्धा.
नाना म्हणायचे तुझ्यासाठी तो ५०० वा फोटो असेल तर त्या माणसासाठी पहिला आणि अंतिम.
शिवाय घरी जाऊन ती महिला पुढचे किती तरी दिवस त्याच आनंदात राहील.
नानांनी खूप शिकवले त्यातली ही एक गोष्ट.
Love you नाना

प्रेक्षकांचे प्रेम कशात आहे हे समजले की सगळं सोपं होतं.
पण ती गोष्ट सोपी करून सांगणारा #बापमाणूस आपल्या बरोबर हवा!

हेही वाचा : Video : ‘मुरांबा’ फेम सुलेखा तळवलकरांनी घेतली नवीन गाडी! म्हणाल्या, “कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अश्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्रत्येक व्यक्तीला आदर-प्रेम देणं शक्य नसतं पण ताईंसाठी अशक्य असं काहीच नाही”, “ताई असेच लोकांमध्ये मिसळत जा”, “मराठी कलाकार मराठी अस्मिता” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.