आतापर्यंत अनेक मालिका, नाटके, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. किरण मानेही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ‘बिग बॉस’नंतर ते छोट्या पडद्यावर दिसले नाहीत. पण आता लवकरच ते एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे.

किरण माने यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर करताना काही बिहाइंड द सीन्स फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिलं, “नवीन मालिका, नवी भूमिका! सहसा माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या हिरॉईनभोवती फिरणाऱ्या असतात. अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरीत्या लक्षवेधी कॅरेक्टर्स साकारायला मिळाली, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाऊ शिरीषदादा… ‘मुलगी झाली हो’मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, ‘अँग्री यंग मॅन’ विलास पाटील… हे परस्परविरोधी धाटणीचे दमदार रोल्स करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टी.आर.पी.चे रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठले होते!”

हेही वाचा : “‘TDM’ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला…,” किरण मानेंनी व्यक्त केली खंत; पोस्ट चर्चेत

पुढे ते म्हणाले, “आता मी छोट्या पडद्यावर आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारतोय. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनही केलं नसेल! शूटिंगला नुकतीच सुरुवात झालीय. खूप मजा येतीये. कुठल्या वाहिनीवर, कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन… तोपर्यंत stay tunned.”

आणखी वाचा : “‘बकरा’ गळाला लागलाय म्हणून…,” किरण मानेंनी केले आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना लक्ष्य; पोस्ट चर्चेत

आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर त्यांचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. ते मोठ्या काळानंतर मालिकेत दिसणार असल्याने त्यांचे चाहते खूप उत्सुकता व्यक्त करत आहेत.