Aishwarya & Avinash Narkar Dance Video : इन्स्टाग्राम-फेसबुक असो किंवा युट्यूब शॉर्ट्स व्हिडीओ… सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘नटीनं मारली मिठी’ हे गाणं व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने आनंद शिंदेंच्या ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर ठेका धरल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं आहे. सर्वत्र या गाण्याची तुफान क्रेझ निर्माण झाली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजेच ऐश्वर्या व अविनाश नारकरांना सुद्धा आता ‘नटीनं मारली मिठी’ या गाण्याची भुरळ पडली आहे. नुकताच या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर जोडप्याने जबरदस्त डान्स केला. ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“तिच्या डोळ्याला गॉगल काळा…” या गाण्यातील ओळीप्रमाणे ऐश्वर्या व अविनाश नारकर एकदम जबरदस्त एनर्जीने, डोळ्याला काळा गॉगल लावून या व्हायरल गाण्यावर डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “संडे स्पेशल” असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अरे ती आयकॉनिक पोझ मिस केलीत”, “कमाल डान्स”, “लय भारी”, “या वयात दोघांनीही जबरदस्त डान्स केलाय”, “अफलातून एनर्जी आहे सर आणि मॅडम”, “दोघांची एनर्जी पाहून थक्क झालो”, “एव्हरग्रीन एनर्जेटिक कपल”, “काय एनर्जी आहे राव मस्त डान्स केलात” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकरांना मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आजवर मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. अभिनयासह सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यांवर ही जोडी नेहमीच भन्नाट डान्स करताना दिसते.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पार्थ आणि जीवाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. तर, ऐश्वर्या नारकरांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच संपली. आता ही जोडी नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.