Akshay Kelkar Reply To Netizen : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेबद्दलचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सरकारच्या पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. यामुळे राजकीय वातावरण पेटलं आणि सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. शिवाय हिंदी भाषेची सक्ती नको याबद्दल अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अशातच अभिनेता अक्षय केळकरनेही मराठी भाषेबद्दलची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने असं म्हटलं, “माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, जे जन्माने अमराठी असून चार ते पाच वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत. परंतू ते खूप छान मराठी बोलतात.”

यानंतर त्याने असं म्हटलं की, “बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाहीये, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात, अशीही काही माणसे आहेत. तुम्ही ज्या राज्यात वास्तव्याला आहात, त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येणं ही अपेक्षा खरंच इतकी मोठी आहे?”

अक्षय केळकर इन्स्टाग्राम स्टोरी

यापुढे अक्षय म्हणतो, “प्रत्येक राज्य जर तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारेच ठरवण्यात आला आहे, तर त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली जावी ही अपेक्षा चूक कशी काय असू शकते? तरीही, कोणत्याही कारणामुळे जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर किमान सौजन्यपूर्वक ही बाब मान्य करून मुजोरी न दाखवता ही संवाद साधता येऊ शकतो.”

नेटकऱ्याच्या प्रश्नाला अक्षय केळकरचं स्पष्ट उत्तर (फोटो : स्क्रीनशॉट)
नेटकऱ्याच्या प्रश्नाला अक्षय केळकरचं स्पष्ट उत्तर (फोटो : स्क्रीनशॉट)

अक्षयच्या या पोस्टखाली एका नेटकऱ्याने “मराठी बोलायला येत नसेल, तर त्या व्यक्तीचं वय न बघता कानशिलात वाजवणे पण योग्य… एकच अट चार-पाच जण यावे आणि भगवा शेला वगैरे परिधान करावे आणि हाणावे. बरोबर?” अशी कमेंट केली. यावर अक्षयनेही त्याला उत्तर देत असं म्हटलं, “नहीं आती क्या करे? अशी माजोरडी उतर देणं योग्य आहे? त्यापेक्षा क्षमा करो, हमें नही आती हम सिख लेंगे. एवढीच अपेक्षा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी समर्थन देत “दादा तूझे विचार अगदी योग्य आहेत”, “आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची भाषा ही यायलाच हवी”, “मराठी भाषा येणं अपेक्षित आहेच” अशा अनेक प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या आहेत.