Akshay Kelkar Shared Kokan Video : मराठी मालिका आणि रिअॅलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेलं एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता अक्षय केळकर. अक्षयने ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येही सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा तो विजेता होता. या शोमुळे अक्षय आणखीनच लोकप्रिय झाला. अभिनेता गेल्या महिन्यात ९ मे रोजी विवाहबंधनात अडकला. दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने गर्लफ्रेंड साधनाशी लग्नगाठ बांधली.
गेल्या महिन्यात अक्षय-साधना अडकले विवाहबंधनात
गेल्या वर्षी अक्षयने गर्लफ्रेंड रमाबरोबरच्या नात्याची जाहीर प्रेमाची कबुली देत लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं आणि ९ मे रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. अक्षय त्याच्या बायकोला प्रेमाने रमा अशी हाक मारतो. त्यामुळेच या लग्नसोहळ्यादरम्यान अभिनेत्याने ‘रमाक्षय’ हा हॅशटॅग क्रिएट केला होता. अक्षय-साधनाच्या या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
लगानंतर कोकणातल्या गावी पोहोचला कोकणातल्या गावी
सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारा अक्षय युट्यूबवरही तितकाच सक्रीय असतो. युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातूनही तो त्याच्या आयुष्यातील घडामोडीही चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. लग्नानंतर अक्षय पत्नी साधनासह त्याच्या कोकणातील गावी कुलदेवतेचं दर्शन घ्यायला गेला होता आणि याचा खास व्हिडीओ त्याने युट्यूबवर शेअर केला आहे. अक्षय त्याच्या आई, बहीण आणि पत्नीसह कोकणात गेला होता.
अक्षय-साधना यांनी घेतलं कुलदैवत दाभलेश्वरचं दर्शन
अक्षयने युट्यूबवर शेअर केलेल्या या खास व्हिडीओमध्ये तो पत्नीबरोबर कुलदैवत दाभलेश्वरचं दर्शन घेत असल्याचे पहायला मिळत आहे. देवळानजीकची चाफ्याची फुलं गोळा करून त्यांनी ती देवाला वाहिली. तसंच यानंतर अक्षय आणि साधना यांनी देवाच्या चरणी नारळ वाहिलं आणि दोघांनी मिळून दर्शनही घेतलं. यानंतर त्यांनी समुद्राजवळच्या एका रिसॉर्टवर जात तिकडे काही खास क्षण एन्जॉय केले.
अक्षय-साधना यांच्या कामाबद्दल थोडक्यात
दरम्यान, अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये सहभाग घेतला होता. याशिवाय त्याने ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये सूत्रसंचालन केलं होतं. तो कलर्स मराठीच्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. तसंच तो ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातही पाहायला मिळाला होता. तर अक्षयची पत्नी साधना काकतकर ही एक गायिका आहे. तिने अल्बममधील गाण्यांसाठी गायन केलं आहे.