Amruta Pawar Welcomes Baby Boy : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार. या मालिकेमध्ये तिने साकारलेली अदिती ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. काही दिवसांपुर्वी अमृताने सोशल मीडियाद्वारे आई होणार असल्याची गुडन्यूज सांगितली होती. अमृता आणि नील यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितलं होतं. “Baby On The Way” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

एस्केलेटरवर सुरुवातीला अभिनेत्री व तिच्या नवऱ्याच्या चपला असतात मग, काही वेळाने लहान बाळाचे शूज येतात असा हटके व्हिडीओ शेअर करत अमृताने आई होणार असल्याची खुशखबर दिली होती. अशातच अभिनेत्री आई झाली आहे. अमृता पवारच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. याबद्दल अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. अमृताचा पती नीलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांना मुलगा झाल्याची गुडन्यूज दिली आहे. “कुटुंब! जिथे जीवन सुरू होते आणि प्रेम कधीच संपत नाही.” असं म्हणत नीलने पत्नी अमृताला मुलगा झाल्याची खुशखबर सांगितली आहे.

अमृताने पती नीलची ही स्टोरी री-शेअर करत आई होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी अमृताने बाळाला जन्म दिला. अमृताने जुलै २०२२ मध्ये नील पाटीलबरोबर लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. अमृता पवार आणि नील पाटील यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. अशातच आता त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आई झाल्याबद्दल मनोरंजन सृष्टीतील कलाकार व तिच्या अनेक चाहत्यांकडून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

अमृता पवार इन्स्टाग्राम स्टोरी
अमृता पवार इन्स्टाग्राम स्टोरी

आजवर अनेक भूमिकांमधून अमृता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आपल्या भूमिकांमुळे लक्षात राहणारी अमृता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. अमृता व तिचा पती नील अनेक ठिकाणी फिरायला जात असतात आणि या ट्रीपचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपुर्वी तिने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटोही शेअर केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री अमृता पवारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेसह ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.