Varsha Dandale On How To Raise Kids: अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. सकारात्मक, तसेच नकारात्मक भूमिका साकारत त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळते.
वर्षा दांदळे सध्या ‘अशोक मा. मा’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. मात्र, सध्या त्या त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता एका मुलाखतीत त्यांनी मुलांशी कसे वागले पाहिजे, यावर वक्तव्य केले आहे.
ती मुलं जेव्हा मोठी होतात…
वर्षा दांदळे यांनी नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वर्षा दांदळे म्हणाल्या, “लहानपणीच्या जखमा मिटत नाहीत. आपल्याला वाटतं की, आपलं मूल आपली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्या मुलांबाबत आपण कोणाहीसमोर कसंही वागतो. नीट बस, इकडे-तिकडे नको जाऊ, तुला काय कळतंय, एक फटका देईन, असे म्हणत असतो. तर चार माणसांसमोर आपलं हे बोलणं ऐकूण त्या मुलाच्या आतमध्ये खूप काही कोसळलेलं असतं.”
“त्यावेळी त्या मुलामध्ये तो आत्मविश्वास नसतो किंवा त्याला त्याची जाणीव नसते, आणि त्यामुळे तो त्या वेळेला त्यावर व्यक्त होत नाही. पण, त्या जखमा, ते व्रण त्याच्या मनात असतात. मग, ती मुलं जेव्हा मोठी होतात, तेव्हा त्यांच्यावर झालेले आघात भलत्याच लोकांसमोर भलत्याच मार्गाने बाहेर पडतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण फक्त शरीराच्या दुखण्याकडे लक्ष देतो; मनाच्या दुखण्याकडे लक्ष देत नाही. मनाची दुखणी असतात, त्याची सुरुवात लहानपणी झालेली असते. त्यामुळे तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. त्याला भरपूर प्रेम द्या. त्याचं त्याला जगू द्या”
पुढे उदाहरण देत वर्षा दांदळे म्हणाल्या की, मी कुठेतरी एक गोष्ट वाचली होती. एका बाईचं मूल त्याचा अभ्यास झाल्यानंतर आकाश बघायचा. त्या महिलेची मैत्रीण घरी येते. ती त्याला म्हणते की, हा सतत आकाशच बघतो. याला डॉक्टरकडे घेऊन जा. त्यावर त्याची आई म्हणते की, तो त्याचं आकाश बघतोय. तो जेवला आहे, त्याचा अभ्यास झाला आहे. आता तो आकाशाकडे बघत बसला आहे. ही किती छान गोष्ट आहे. अशा आई असल्याच्या पाहिजेत.
“मुलांकडे फक्त लक्ष ठेवा. ते अगदीच शिव्या देत असतील किंवा इतर गोष्टी करीत असतील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण, त्यामागची कारणंदेखील तुमच्याच घरात असतात. तुमच्या घरात तुम्ही नवरा-बायको भांडत असता. एकमेकांना अद्वातद्वा बोलत असता. घरातलं मूल ते स्वत:मध्ये झिरपवून घेत असतं”, असं म्हणत मुलांना कसं वाढवलं पाहिजे, याबद्दल वर्षा दांदळे यांनी वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, वर्षा दांदळे यांच्याबरोबरच ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत दिग्गज अभिनेते अशोक सराफ, रसिका वाखारकर, नेहा शितोळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. तसेच, नुकतीच अभिनेता इंद्रनील कामतची मालिकेत एन्ट्री झाली आहे.