Actress Mayuri Wagh : ‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघला घराघरांत लोकप्रियता मिळाली. या मालिकेने एकेकाळी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. याच मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुष रानडे यांची मैत्री झाली, पुढे हा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहोचला. मात्र, वर्षभरानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याबाबत अभिनेत्री पहिल्यांदाच मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे.
मयुरी वाघ मधली काही वर्षे सोशल मीडियापासून दूर होती. पहिल्यांदाच तिने वैयक्तिक आयुष्याविषयी सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’च्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. लग्नाबाबत विचारल्यावर मयुरी म्हणाली, “मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. पण, मी लग्नाचा निर्णय फारच लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहतेय…लोक फार विचार करून लग्न करतात. हे मी केलं नाही…पण, आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक एक्स अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे….कुटुंबात या गोष्टी पाहिजेत हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही. तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल…पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला.”
मयुरी पुढे म्हणाली, “तेव्हा ‘ती फुलराणी’ या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. सहकलाकारांनाही जाणवलं होतं की, माझ्या आयुष्यात काहीतरी सुरू आहे. जे मी कोणाबरोबरही शेअर करू शकत नव्हते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी घडतंय; ज्या सगळ्याचा मला त्रास होतोय, मी डिस्टर्ब आहे…किंवा सीन संपला की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसत होतं. माझे सहकलाकार त्यावेळी सतत माझ्याबरोबर असायचे. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चारवाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे. कारण, तेव्हा मला झोपच लागायची नाही.”
“माझ्या आई-बाबांना ४ महिन्यांत समजलं होतं की, हे सगळं चुकलंय पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे गेली. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही…असं मला वाटत होतं. आता असं जाणवतं की आपण तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजे होता. वेगळं होणं वगैरे या गोष्टी फार आधी घडल्या असत्या. पण, मला सगळ्या गोष्टी स्वीकारायला खूप वेळ गेला.” असं मयुरीने सांगितलं.
जवळच्या मित्रांजवळ मी सगळं बोलू शकत नव्हते
“सगळ्या गोष्टींची जाणीव झाल्यावर आता आयुष्यात पुढे जावं, थांबावं की, आहे तसं सोडून द्यावं…मला माझंच कळत नव्हतं. पण, तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. रात्री अडीच वाजता मशिन लावायचे, संपूर्ण किचनमध्ये साबणाचं पाणी टाकून सगळं घासून काढलंय…त्या काळात मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि कारण, फक्त एकच होतं मला माझ्या डोक्यातून सगळं काही काढून टाकायचं होतं. मी तेव्हा एकटीच होते…त्यामुळे घरात मासे आणून ठेवले होते. जवळच्या मित्रांजवळ मी सगळं बोलू शकत नव्हते त्यामुळे मी या माशांबरोबर बोलायचे.”
…तेव्हा ठरवलं की आता याच्यापुढे नाही
“मला माझ्या आई-बाबांसमोर रडायला आवडत नाही. त्यांना मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या सुद्धा नाहीयेत. एकीकडे मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरू होता…पण, माझ्या वैयक्तिक आयुष्यात सेपरेशनचा काळ सुरू होता. या सगळ्यामुळे मला आता सहज कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. अनेक गोष्टी मी समोरून विचारल्या आहेत. त्यावेळी…. ‘तुला माहितीये ना आपली इंडस्ट्री कशीये’ असं स्पष्टीकरण यायचं. हे ऐकून मग आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटलं होतं. जेव्हा मला या सगळ्याचा रिअॅलिटी चेक मिळाला. तेव्हा ठरवलं की आता याच्यापुढे नाही.”
“आपल्याकडे मुलींना सहन करायला शिकवलं जातं. लग्नानंतर गोष्टी बदलतात असं सांगितलं जातं, जरी एखादी गोष्ट नाही पटली..तरी आपलाच माणूस आहे म्हणून त्या गोष्टी सोडून दिल्या जातात. पण, हे शिकवत असताना सगळ्या मुलींना… या सगळ्याला एक लिमिट असते असंही सांगितलं पाहिजे. आपला स्वत:चा स्वाभिमान जपता आला पाहिजे.” असं मत मयुरीने व्यक्त केलं आहे.