Bhagyashree Dance Video: अभिनेत्री भाग्यश्रीला १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अभिनेत्रीने सुमन ही भूमिका साकारली होती.

चित्रपटातील गाणी, सुमन व प्रेम यांच्यातील केमिस्ट्री, सुमनचा गोड आवाज आणि चित्रपटाची कथा अशा सगळ्याच गोष्टींमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. सूरज बडजात्या यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा प्रभाव आजही असल्याचे पाहायला मिळते. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत.

आता नुकतीच भाग्यश्रीने सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर ५’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या सीझनमधील स्पर्धक आध्यश्रीने भाग्यश्रीसाठी खास गोष्ट केली आहे. सोनी लिव्हने सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते की आध्यश्री स्टेजवर येते. ती येते तेव्हा ती सलमानच्या स्टाइलमध्ये चालत असल्याचे दिसते. त्यानंतर ती आणि भाग्यश्री ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील ‘आया मौसम दोस्ती का’ या गाण्यातील ‘तुम लडकी हो…’ या ओळींवर डान्स करताना दिसते. दोघीही सारख्याच स्टेप करताना दिसत आहेत.

व्हिडीओच्या शेवटी आध्यश्री भाग्यश्रीला थँक्यू असे म्हणते. त्यावर भाग्यश्री चित्रपटातील डायलॉग म्हणते, “दोस्तीचा एक नियम असतो, नो सॉरी, नो थँक्यू.” भाग्यश्री आणि आध्यश्रीच्या या परफॉर्मन्सचे शिल्पा शेट्टी, गीता कपूर तसेच टेरेन्स टाळ्या वाजवत कौतुक करताना दिसत आहेत.

तसेच, अनेक नेटकऱ्यांनीदेखील व्हिडीओवर कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. “माझे आवडते सलमान सर”, “वाह”, “छान”, “क्यूट”, “सुंदर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर ‘मैंने प्यार किया’नंतर तिने लग्न केले. त्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा ती अभिनय क्षेत्राकडे वळली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा ती रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी होताना दिसते. तसेच भाग्यश्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

काही वेळा भाग्यश्री सोशल मीडियावर काही डान्स व्हिडीओ शेअर करते. काही वेळा ती तिचे सुंदर फोटो शेअर करते. आता काही वेळा अभिनेत्री रेसिपीदेखील चाहत्यांना सांगते.