Bigg Boss 19 Amaal Malik Viral Video : टीव्हीवरील ‘बिग बॉस’ हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा शो आहे. नुकताच हिंदी ‘बिग बॉस’ शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भांडण, वादविवाद, हेवेदावे, रूसवे-फुगवे… यामुळे शो आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा होताना दिसत आहे. शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. या शोमधील सर्वात चर्चेतला स्पर्धक म्हणजे अमाल मलिक.

गेले दोन आठवडे अमाल त्याच्या खेळामुळे चर्चेत आहे. खेळाबद्दल त्याचं कौतुक होत आहे, मात्र त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे. त्याच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर बरीच टीका केली जात आहे. नेमकं काय आहे हे कारण, चला जाणून घेऊ…

सोशल मीडियावर ‘बिग बॉस’मधील अमालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो स्वयंपाकघरातील सिंकमध्ये थुंकताना दिसत आहे. या कृत्याबद्दल प्रेक्षकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अमाल नळातून बाटली भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नळीनेच थेट पाणी पितो आणि नंतर स्वयंपाकघरातील सिंकमध्ये थुंकतो. तसंच तोंड लावून पाणी प्यायल्यानंतर, तो ती नळी स्वच्छ न करता निघून जातो.

अमालच्या या घृणास्पद वागणुकीबद्दल सोशल मीडियावर टीका केली जात आहे. तसंच इतका मोठा सेलिब्रिटी असूनही त्याला स्वच्छतेचे साधे नियम माहीत नाहीत का? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसंच संपूर्ण घराचं मिळून हे एकच स्वयंपाकघर आहे, मग अमालने किमान स्वच्छतेचं तरी भान ठेवावं असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

अमालच्या व्हायरल व्हिडीओवर “हा अमाल मलिक किती अस्वच्छ आहे!”, “काही आठवड्यांपूर्वी अमालनं वापरलेला चमचा थेट भाताच्या भांड्यात टाकला होता आणि आता तर थेट तोंड धुऊन स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये थुंकला! शी… किती घाण आहे हे!”, “अशाप्रकारे सिंकमध्ये थुंकणं म्हणजे खरंच चूक आहे”, “असं स्वयंपाकघरात कोणी थुंकतं का? कितीही गलिच्छ वाटत आहे हे!” “आता सलमान सर यावरही म्हणतील तो आजारी होता म्हणून तसं पाणी प्यायला… शी… हे किती अस्वच्छ आहे. इतर स्पर्धकांना हे माहितसुद्धा नाही” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून टीका केली आहे.

दरम्यान, अमालच्या या कृत्याबद्दल सलमान खान काय प्रतिक्रिया देणार? हे येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या वीकेंड का वार मध्ये पाहायला मिळेल. अमालच्या या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला काही शिक्षा होणार का? याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.