Bigg Boss 19 nomination : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता ५० दिवस पूर्ण झाले आहेत. जसजशी ही स्पर्धा पुढे जात आहे, तसा दिवसेंदिवस हा खेळ अधिकच मनोरंजक आणि रंगतदार बनत चालला आहे. या सीझनमध्ये कोण विजेता ठरेल याचा अंदाज लावणं प्रेक्षकांसाठीही कठीण झालं आहे. ‘बिग बॉस १९’मधील जवळपास सगळेच स्पर्धक उत्तम खेळताना दिसत आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी अभिनेता झीशान कादरी घरातून बाहेर पडल्यानंतर कोणताच स्पर्धक घराबहेर पडला नाही. गेल्या आठवड्यातही दिवाळीच्या सेलिब्रेशनमुळे एविक्शन पार पडलं नव्हतं. मात्र, या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे आणि यात घरातल्या उत्तम स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.

या आठवड्यात चेन टास्कद्वारे होणार नॉमिनेशन

‘बिग बॉस १९’मध्ये या आठवड्यात नॉमिनेशनसाठी ‘चेन टास्क’ ठेवण्यात आला आहे. या टास्कमध्ये एक स्पर्धक दुसऱ्याला वाचवतो किंवा नॉमिनेट करतो. हा टास्क चार स्पर्धक नॉमिनेट झाल्यावर थांबवण्यात येणार आहे. या टास्कची सुरुवात कुनिका सदानंदने गौरव खन्नासह केली. गौरवने नेहलला नॉमिनेट केलं, नंतर नेहलने अमालला वाचवलं, पुढे अमालने शहबाजला वाचवलं. मग शहबाजने प्रणीतला नॉमिनेट केलं. यानंतर प्रणीतने अभिषेकला वाचवलं, मग अभिषेकने बसीरला नॉमिनेट केलं आणि शेवटी, बसीरने गौरवला नॉमिनेट केलं.

‘या’ स्पर्धकांवर आहे नॉमिनेशनची टांगती तलवार

त्यामुळे या आठवड्यात प्रणीत मोरे, नेहल चुडासमा, गौरव खन्ना आणि बसीर अली यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या चौघांपैकी प्रत्येक जण उत्तम स्पर्धक आहे. मात्र, सध्याच्या गेमप्लेमुळे प्रणीत मोरेला अधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. गेले काही आठवडे प्रणीतचं नाव सातत्याने नॉमिनेशनमध्ये येत आहे.

बिग बॉसच्या घरात तो एकेक टास्क उत्तम पद्धतीने खेळत आहे. त्याचा स्वभावही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. पण सततच्या नॉमिनेशनमुळे प्रणीतच्या या घरातील टिकून राहण्यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, आता या आठवड्यात कुणाचा गेम कसा रंगणार? कोण टिकणार? आणि कोण घराबाहेर जाणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.