Dhananjay Powar On Pranit More Bigg Boss 19 Updates : हिंदी टेलिव्हिजन विश्वात सध्या ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची चर्चा सुरू आहे. या शोमध्ये नुकतंच प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळालं. अमाल मलिकने प्रणितच्या अपरोक्ष त्याच्या विरोधात अपशब्द वापरले तर, बसीर अलीने प्रणितला ‘फ्लॉप कॉमेडियन’ म्हणून हिणवलं. खरंतर, या भांडणाला प्रणितने सुरुवात केली नव्हती. तो पहिल्या दिवसापासून शोमध्ये आपल्या गेमवर लक्ष केंद्रीत करताना दिसला.
मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रणितचा संयम सुटला आणि तो थेट अमाल मलिकला, “तू माझ्याबद्दल काय बोललास?” असा जाब विचारायला गेला. या भांडणादरम्यान सुद्धा अमाल मलिकने “तुला मी आता एकच वाजवेन”, “तू माझा बाप लागतोस का”, “किचनमधल्या भांड्यांप्रमाणे मी तुला सुद्धा धुवून टाकेन” असं म्हणत प्रणितशी वाद घालायला सुरुवात केली. दोघांमध्ये टोकाचे वाद झाले शेवटी, अन्य स्पर्धकांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. बसीर अली सुद्धा यावेळी प्रणितच्या विरोधात होता.
प्रणित या आठवड्यात सुद्धा नॉमिनेट आहे. त्यामुळे सगळे मराठी क्रिएटर्सला प्रणितला सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. घरातील सगळे मिळून प्रणित टार्गेट करत आहेत, त्यामुळे आपल्या मराठी मुलाला आपणच सपोर्ट केला पाहिजे असं सांगत ‘बिग बॉस मराठी’चा स्पर्धक धनंजय पोवारने व्हिडीओ शेअर केला आहे.
धनंजय म्हणतो, “हा व्हिडीओ नीट बघा…हे असं मराठी माणसाबरोबर केलं जातं. ( शोमधील एक क्लिप दाखवली -ज्यात अमाल प्रणितशी असभ्य वर्तन करत आहे ) सतत तुच्छ लेखलं जातं, सतत कमी लेखलं जातंय. आता जे काही करायचंय, जो काही इतिहास घडवायचा असेल… तो संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन घडवला पाहिजे. तुम्ही हिंदी लोक आम्हाला ज्याप्रकारे ट्रोल करताय, चेष्टा-मस्करी करताय…या सगळ्या गोष्टींमुळे आमची मनं दुखावतात. हे लक्षात ठेवा. या प्रणित मोरेला…आमच्या मराठी माणसाला तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात ज्याप्रकारे ट्रोल करत आहात…त्याच्याबरोबर जे किडे करताय ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.”
“आजच्या घडीला सर्वाधिक सोशल मीडिया वापरणारा वर्ग हा महाराष्ट्रात आहे. हा मराठी माणूस म्हणजे जोक नाहीये. प्रणित तू फक्त लढ…आम्ही ११ कोटी नागरिक तुझ्याबरोबर आहोत. तुझा खेळ सुंदर आहे…असाच खेळत राहा.” असं धनंजय पोवारने सांगितलं.