Bigg Boss 19 Farhana Bhatt : टीव्हीवरील वादग्रस्त तरीही तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता जवळपास दीड महिने झाले आहेत आणि हा खेळ जसाजसा पुढे जात आहे, तितकाच तो अधिक स्पर्धात्मकही होत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यातच ‘बिग बॉस’ या स्पर्धकांना एकमेकांविरुद्ध उभे करणारे टास्क देत आहे. अशातच गुरुवारच्या झालेल्या भागात ‘बिग बॉस’नं सर्वांना असाच एक कठीण टास्क दिला होता.

‘बिग बॉस’च्या घरात नुकताच कॅप्टन्सीसाठीचा टास्क पार पडला आणि या टास्कमध्ये स्पर्धकांच्या भावभावनांचा कस लागला. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना घरच्यांकडून काही पत्र पाठवण्यात आली होती. यात सहस्पर्धकाच्या नावाने आलेलं पत्र जर त्याला वाचायला दिलं तर तो संबंधित स्पर्धक कॅप्टन बनण्याचा दावेदार ठरू शकत नाही आणि तेच पत्र जर त्याने संबंधित स्पर्धकाला वाचायला देण्याऐवजी फाडलं, तर तो स्पर्धक कॅप्टन बनण्यासाठी दावेदार ठरू शकतो.

यात सुरुवातीला प्रणीत मोरेसाठी आलेलं पत्र नेहल चुडासमाला मिळालं, मात्र तिनं प्रणीतच्या भावनांचा विचार करीत पत्र न फाडता त्याला वाचायला दिलं आणि कॅप्टन बनण्याच्या टास्कमधून माघार घेतली. यानंतर कुनिका यांच्यासाठी आलेलं पत्र गौरव खन्ना याने न फाडता कुनिका यांना सुपूर्द केलं आणि कॅप्टन बनण्याच्या टास्कमधून त्यानेही माघार घेतली. मात्र, हीच वेळ फरहानावर आली तेव्हा तिनं केलेल्या कृतीमुळे अनेक जण तिच्यावर संताप व्यक्त करीत आहेत.

नीलमसाठी आलेलं पत्र फरहानाला मिळालं, मात्र हे पत्र तिनं नीलमला वाचायला न देता फाडून टाकलं. फरहानानं पत्र फाडताच घरातील सर्वच स्पर्धकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला, यामुळे फरहानाला कुणाच्याच भावनांची कदर नसल्याच्या टीका केली जात आहे. फरहानाची ही कृती अनेकांच्या रागाचं आणि संतापाचं कारण बनली आहे. केवळ घरातील स्पर्धकच नव्हे; तर प्रेक्षकांनासुद्धा फरहानाची ही कृती अजिबात आवडलेली नाही.

फरहानाला पत्र मिळताच नीलम तिला ते पत्र फाडू नये म्हणून विनंती करते, पण फरहानाने तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिने नीलमच्या घरच्यांनी दिलेलं पत्र फाडून टाकलं आणि कॅप्टन्सीची दावेदारी मिळवली. यानंतर अमाल, बसीर, तान्या, प्रणीत, कुनिका यांच्यासह अनेकांनी जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावरही फरहानाला या चुकीबद्दल ट्रोल केलं जात आहे. फरहानाच्या या वागणुकीबद्दल तिच्यात अजिबातच माणुसकी नाही अशी टीका होत आहे. दरम्यान, फरहानानं यावर तिची प्रतिक्रिया व्यक्त करीत मी हे एक टास्क म्हणून केलं असल्याचं म्हटलं.