Bigg Boss 19 ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी बिग बॉसच्या घरात नवीन काहीतरी घडताना दिसते. छोट्या छोट्या गोष्टींवरून स्पर्धकांमध्ये भांडणे होतात. एकमेकांना टोमणे मारले जातात. तर, अनेकदा हे स्पर्धक दुसऱ्यांच्या दु:खात स्वत:चे दु:ख मानतात, भावुक होतात, एकमेकांसाठी त्याग करतात. त्यांच्यातील मैत्रीसाठी ते अनेक गोष्टी करताना दिसतात.

बिग बॉसच्या घरातील कामे घरातील स्पर्धकांना करावी लागतात. अगदी जेवण बनवण्यापासून ते घरातील कचरा काढणे, भांडी स्वच्छ करणे आणि घरातील सर्व कामे स्पर्धकांना वाटून दिली जातात. घरातील कामे सुरळीतपणे पार पडत आहेत की नाही हे पाहण्याची, स्पर्धकांना कामे देण्याची जबाबदारी प्रत्येक आठवड्यातील कॅप्टनची असते. अनेकदा या कामांवरून बिग बॉसच्या घरात जोरदार भांडणे पाहायला मिळतात.

आता बिग बॉस १९ चा असाच एक प्रोमो पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस १९ एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, गौरवची भांडी घासण्याची ड्युटी होती. त्याने चमचे स्वच्छ केले नाहीत म्हणून त्याला इतर स्पर्धक जाब विचारत आहेत. गौरव खन्नादेखील त्यांना सडेतोड उत्तर देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा झालं मोठं भांडण

प्रोमोच्या सुरुवातीला कुनिका सदानंद गौरवला विचारतात की, तू तिथे १० चमचे तसेच ठेवलेस. का?, त्यानंतर नीलम येते, ती त्याला म्हणते की, चमचे धुवायला लागतील. नाही तर भांडी स्वच्छ करण्याची ड्युटी करू नका. यादरम्यान गौरव व्यायाम करीत असल्याचे दिसत आहे. इतर सदस्यांनी त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो संतप्त झाल्याचे दिसते. तो म्हणतो की, मी का चमचे स्वच्छ करू? त्यानंतर बसीर म्हणतो की, त्याला भांडी स्वच्छ करण्याची ड्युटी देऊ नका. इतर लोक करतील. त्यावर गौरव म्हणतो, आता तू याचा निर्णय घेणार का?

त्यानंतर गौरव कोणाला तरी तरी सांगतो की, ते सगळे मिळून मला प्रश्न विचारत आहेत. अमाल म्हणतो तुम्ही ऐकत नाही. त्यामुळे चार लोकांना एकत्र यावं लागतं. त्यावर गौरव म्हणतो की, चार येऊ देत, पाच येऊ देत, जे चूकीचे आहे, ते चुकीचे आहे. त्यावर नेहल म्हणते की, १० लोकांच्या विरुद्ध तुम्हाला एकट्याला उभं राहायचं आहे. कारण- तुम्ही चुकीचे आहात. शेवटी गौरव म्हणतो की, मला फरक पडत नाही.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी गौरव खन्नाचे कौतुक केले आहे. “गौरव खन्ना मस्त खेळत आहे”, “गौरव खन्नाचे बरोबर आहे”, “सगळे आता गौरवच्या विरोधात बोलतील. त्यानं खंबीरपणे प्रसंगाचा सामना केला पाहिजे”, “गौरव खन्ना पुन्हा एकदा खेळात उतरला आहे” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ज्या गौरवच्या समर्थनार्थ आहेत.

गेल्या काही दिवसांत अनेकदा गौरवला सलमान खानने त्याचा खेळ दिसत नसल्याचे म्हटले होते. आता गौरव त्याची मते व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान, आता नेमके काय घडले, गौरवच्या बाजूने कोणते स्पर्धक असणार, शेवटी काय घडणार हे एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. या प्रोमोमुळे एपिसोड पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.