Bigg Boss 19 New Promo : टीव्हीवरील काही लोकप्रिय आणि वादग्रस्त शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस’चं १९ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हा शो सुरू होऊन आता जवळपास महिना झाला असून या शोमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात भांडण आणि वादविवाद काही नवे नाहीत. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांचे एकमेकांशी वाद होताना दिसतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागात मराठी कॉमेडियन प्रणित मोरे आणि टीव्ही अभिनेता बसीर अली यांच्यात जोरदार वाद झाला. खरंतर गायक अमाल मलिक आणि प्रणित यांच्यात सुरू असलेल्या भांडणात बसीरने उडी घेतली. नंतर या तिघांमध्ये बाचाबाची झाली. ज्यात प्रणित, अमाल आणि बसीर एकमेकांना भिडले.
या वादादरम्यान, अमालने ‘बिग बॉस’चा स्पर्श न करण्याचा नियम मोडला. यावर ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी यांनी बसीरवर निशाणा साधत प्रणितला पाठिंबा दर्शवला होता. अशातच आता शोचा होस्ट सलमान खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस १९’च्या ‘वीकेंड का वार’च्या आगामी भागाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यात सलमान अमालवर संतापलेला दिसत आहे. अमालने घरात वापरलेली अर्वाच्य भाषा आणि इतर स्पर्धकांच्या कुटुंबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अमालवर टीका केली.
या प्रोमोमध्ये, सलमान अमालला म्हणतो, “अमाल, तू जेव्हा घरात आला होता, तेव्हा म्हणाला होता की मी माझी इमेज सुधारण्यासाठी आलोय. पण तसं होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीला शिव्या देणं, दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल बोलणं चूक आहे. तुझे फॅन्स आहेत, लहान मुलं आहेत, तुला वाटतं का त्यांनी अशा भाषेचा वापर करावा? त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल? “
यापुढे सलमानने अमालचं कौतुकही केलं. तसंच त्याला सल्लादेखील दिला. सलमान म्हणाला, “तू खूप टॅलेंटेड मुलगा आहेस. तुझं हे टॅलेंट वाया घालवू नकोस. मला वाटतं, तू शो नाही जिंकला तरी हरकत नाही. पण तू स्वतःला जिंकलंस तरी महत्त्वाचं आहे.” दरम्यान, या प्रोमोमधून तरी सलमानने अमालवर टीका केली आहे. आता अमालसह सलमान बसीरबद्दल काय म्हणतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या आठवड्यात घरातील एकूण सहा स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या आठवड्यात अशनूर कौर, आवेज दरबार, नीलम गिरी, प्रणित मोरे, मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना हे सहा जण नॉमिनेट झाले आहेत. यापैकी कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.