Bigg Boss 19 Tanya Mittal : ‘बिग बॉस १९’मधील स्पर्धक तान्या मित्तलची शोमध्ये आल्यापासूनच चर्चा आहे. ग्वाल्हेरची उद्योजक, इन्फ्लुएन्सर व मॉडेल म्हणून तान्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस’मध्ये ती ५०० पेक्षा जास्त साड्या, ५० किलो दागिने आणि स्वतःचे चांदीचे भांडे व बाटली घेऊन आल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
तसेच त्यानंतर तिनं ‘मी कॉफी पिण्यासाठी ग्वाल्हेरहून आग्र्याला जाते’, ‘माझं बिस्कीट लंडनहून येतं’, तसेच ‘मी ग्वाल्हेरहून सहा तास प्रवास करून माझी आवडती डाळ खायला जाते, नसेल तर मी उपाशी राहते’ अशी अनेक मोठेपणाचा तोरा मिरवणारी वक्तव्यं केली. त्यामुळे तान्या सोशल मीडियावर अधिकच चर्चेत आली आहे.
तान्या मित्तलच्या या लक्झरी लाईफ स्टाईलबद्दल एका टीव्ही अभिनेत्रीनं तिचं मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्री चाहत पांडेनं तान्याला खोटारडी, असं म्हटलं आहे. तसेच मला एकदा तरी तान्याचं घर पाहायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
चाहतने ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “मला असं वाटतं, मला तान्याचं घर बघावं लागेल. ‘बिग बॉस’नंतर तान्या मित्तल, मला तुझ्या घरी बोलाव. माझ्यासह अनेक लोक आहेत, जे तुझं घर पाहू इच्छित आहेत. कृपया बाहेर ये आणि आम्हाला बोलाव. मी सगळ्यांना तुझं घर दाखवेन. मला हे जाणून घ्यायचं आहे की, तुझ्या घरासमोर सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार किती कमी आहेत? हे बघायला हवं.”
अभिनेत्री चाहत पांडे इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर चाहतनं तान्याच्या डाळ आणि कॉफीविषयी झालेल्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी चाहत म्हणाली, “सुरुवातीला मला हे थोडं मनोरंजक वाटायचं; पण तान्या मला आता प्रत्येक बाबतीत खोटीच वाटते. तिला बघूनच चीड येते. ती फारच खोटी आहे.”
दरम्यान, १५० बॉडीगार्ड, ५०० हून अधिक साड्या, पाण्यासाठी स्वत:ची चांदीची बाटली… या आणि अशा अनेक मजेशीर वक्तव्यांमुळे घरातील सदस्य त्रस्त झाले होते. पण, आता अनेकजण तिच्या या वक्तव्यांची मजा घेतात आणि कधी कधी तिच्यावर विनोदही करतात.