Neelam Giri Expresses Disappointment On Salman Khan: ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक एकमेकांवर त्यांचा राग, रुसवे-फुगवे व्यक्त करताना दिसतात. मात्र, तसेच अनेकदा स्पर्धकांना सलमान खानचं वागणंही पटत नाही. ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खान स्पर्धकांना आठवड्यातील कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देतो. उत्तम टास्क खेळल्याबद्दल किंवा उत्तम वर्तणुकीबद्दल सलमान घरातील स्पर्धकांचंही कौतुक करतो आणि चुकीच्या वागण्याबद्दल टीकाही करतो.
सलमानच्या या प्रतिक्रिया घरातील स्पर्धकांना कधी पटतात तर कधी नाही. असंच काहीसं नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये पाहायला मिळालं. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’मध्ये नीलम गिरीच्या जेवण न बनवण्याच्या वर्तणुकीबद्दल सलमाननं तिला दम दिला. नीलम कुठल्याही गोष्टीचा उगाच मुद्दा बनवते, असं मत सलमाननं व्यक्त केलं. मात्र, या प्रतिक्रियेवर नीलमनं तिची नाराजी व्यक्त केली.
सलमान खाननं मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अभिषेक बजाज, प्रणीत मोरे व अशनूर कौर यांच्या खेळाचं कौतुक केलं. मात्र, हे पाहून नीलमनं नाराजी व्यक्त केली. तिनं याबद्दल तान्या मित्तलला सांगितलं, “इतकं सगळं करूनसुद्धा माझं कधीच कोणी कौतुक केलं नाही.” त्यानंतर तान्यानंही नीलमला सहमती दर्शवीत म्हटलं, “मी काहीही केलं तरी लोक मला चुकीचं समजतात.”
पुढे नीलम म्हणाली, “दुसऱ्या गटाचे लोक काहीही करतील तरी त्यांचं नेहमीच कौतुक केलं जातं. सलमान सरांनी पाहिलं की, अभिषेकनं दोन दिवस जेवण बनवलं; पण त्यांनी हे कधीच पाहिलं नाही की मी तर सुरुवातीपासून हेच करीत आहे. आम्ही कितीही मेहनत केली, तरी आमचं कोणी कौतुक करीत नाही आणि हे पाहून खूप वाईट वाटतं.”
याच भागात सलमाननं अमाल मलिकची बाजू घेतल्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी अमालवर सर्वांत जास्त टीका केली आहे. प्रत्येक वेळी त्याला सुनावलं आहे. त्याच्यावर सुरुवातीपासून ‘वीकेंड का वार’मध्ये सर्वाधिक टीका मीच केली आहे. पण, बाहेरच्यांना वाटतं की, मी त्याची बाजू घेतली. तसं अजिबात नाहीय.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील एका सदस्याचा प्रवास आज संपणार आहे. अभिनेता झीशान कादरीला या घरातून निरोप घ्यावा लागणार असल्याचं काही वृत्तांमधून समोर आलं आहे.