Shiv Thakare Praised Pranit More : ‘बिग बॉस १९’ हा शो सुरू होऊन आता जवळपास ५० दिवस झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये टीव्ही आणि सिनेमा क्षेत्रातील अनेक कलाकार, तसंच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सनी सहभाग घेतला आहे. त्यात मराठमोळा कॉमेडियन प्रणीत मोरेही सहभागी झाला आहे. प्रणीतच्या खेळाचं सुरुवातीपासूनच कौतुक होत आहे. मराठीमधील अनेक कलाकार आणि सोशल मीडियावरील कंटेट क्रिएटर्स प्रणीतला पाठिंबा देत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्या शिव ठाकरेनंसुद्धा त्याचं कौतुक केलं आहे.
शिवनं आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत या चंदेरी दुनियेत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शिव एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या शोमध्येही सहभागी झाला होता. त्यानंतर तो ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. त्या पर्वाचा तो विजेता होता. त्याशिवाय त्यानं हिंदी बिग बॉसही गाजवला आहे. त्यामुळे या खेळाबद्दल त्याला चांगलीच माहिती आहे. अशातच शिवनं ‘बिग बॉस १९’मधील स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यानं प्रणीतच्या खेळाचं कौतुक केलं.
Telly Masala ला दिलेल्या मुलाखतीत शिव म्हणाला, “बसीर अली आणि प्रणीत माझे जवळचे मित्र आहेत. बसीर माझ्याबरोबर रोडीज या शोमध्ये होता आणि प्रणीत तर माझा भाऊ आहे. तो खूपच चांगला खेळ खेळत आहे.” या दोघांशिवाय शिवनं इतर स्पर्धकांबद्दलही प्रतिक्रिया दिली. तसंच त्यानं या स्पर्धकांच्या खेळाचंही कौतुक केलं.
पुढे शिव म्हणाला, “अभिषेकसुद्धा चांगला खेळत आहे. अश्नूर कौरदेखील चांगली खेळत आहे. हे लोक भांडण, वादविवाद करताना कोणतीच मर्यादा ओलांडत नाहीयेत. अभिषेक बजाज, प्रणीत यांचा ग्रुप मला आवडतो.” दरम्यान, शिव ठाकरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो अनेकदा अशा रिअॅलिटी शोमधील अपडेट्सवर लक्ष ठेवून असतो. तसंच सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना दिसतो. अशातच त्यानं ‘बिग बॉस १९’मधील त्याच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया देत, त्यांच्या खेळाचं कौतुक केलं आहे.
शिव ठाकरे इन्स्टाग्राम पोस्ट
‘बिग बॉस १९’च्या या आठवड्यात अनेक ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं. त्यात गेल्या दोन दिवसांत तर ‘बिग बॉस’च्या घरचं वातावरण अधिकच तापलं आहे. अमाल मलिकनं फरहाना आणि तिच्या आईबद्दल असभ्य भाषेत टीका केली, ज्याबद्दल आजच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान त्याचा चांगलाच समाचार घेणार आहे.