Salman Khan Slams Amaal Malik :’बिग बॉस’च्या घरात वादविवाद, भांडणं ही होतच असतात. एखाद्या टास्कवरून स्पर्धकांमध्ये बाचाबाची होते. त्यात अनेकदा संयम न बाळगल्याने बाचाबाचीला भांडणाचं स्वरूप येतं आणि मग त्यात अनेकदा असभ्य भाषा वापरली जाते. असंच काहीसं ‘बिग बॉस १९’च्या गुरुवारच्या भागात झालं. गुरुवारच्या भागात नीलमसाठी आलेलं घरचं पत्र फरहानानं फाडलं. त्यामुळे अमालला राग अनावर झाला आणि त्यानं फरहानाला असभ्य शब्द वापरला.

फरहानानं कॅप्टन होण्यासाठी नीलमच्या कुटुंबीयांनी पाठवलेलं पत्र फाडून टाकलं. ते पाहून अमाल संतापला आणि त्यानं फरहाना जेवत असताना तिच्यासमोरचं प्लेट उचलून फेकून दिली. एवढंच नाही, तर त्यानं ती प्लेट फोडली. त्यानंतर त्यानं फरहानाच्या आईबद्दल अश्लील शब्द वापरत टीका केली, ज्यामुळे घरात आणि प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली.

अमालच्या याच वर्तणुकीचा सलमान आता समाचार घेणार आहे. अमालच्या बेताल वागणुकीवर सलमान ‘वीकेंड का वार’मध्ये खूपच संतप्त झाला असून त्यानं अमालला अंतिम इशारा दिला आहे. याबाबतचा एक प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये सलमान अमालला म्हणतो, “सर्वांना खाणं-पिणं हे परमेश्वरानं दिलंय. मग तुला दुसऱ्याच्या जेवणाची थाळी हिसकावण्याचा अधिकार कोणी दिला? तू फरहानाच्या आईवर टीका केलीस. तुला खरंच वाटतं का की, तू बरोबर आहेस?” त्यानंतर सलमान अमालला “आता मी तुला शेवटची सूचना देतोय”, असं म्हणत त्याला दम दिला.

‘वीकेंड का वार’मध्ये अमालच्या वडिलांनीसुद्धा त्याची समजूत काढली. यावेळी आपल्या मुलाला समजावताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांनी रडत रडत मुलगा अमालला सांगितलं, “मी तुझा बाबा आहे. भांडणं चालतात; पण बोलताना हद्द पार करू नकोस. असं वागून माझ्यावर कोणताही वाईट शिक्का लावू नकोस.” त्यावर अमालही भावूक झाला आणि माफी मागत म्हणाला की, त्याला खूप राग आला होता. म्हणून त्यानं हे केलं.

अमाल मलिकवर संतापला सलमान खान

दरम्यान, अमालनं फरहाना आणि तिच्या आईबद्दल केलेल्या असभ्य भाषेतील टीकेबद्दल शुक्रवारच्या (१७ ऑक्टोबर) भागात माफी मागितली. मी जे काही केलं, ते राग आणि भावनेच्या भरात केलं असल्याचं त्यानं म्हटलं. आता यावर सलमान आणखी काय बोलणार? हे आजच्या ‘वीकेंड का वार’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.