Bigg Boss 19 Zeishan Quadri : ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता महिना उलटून गेला आहे. स्पर्धा अधिक रंगतदार होत असताना, घरातील एकेका स्पर्धकाचा प्रवास संपत आहे. गेल्या आठवड्यात अभिनेता झीशान कादरीचा ‘बिग बॉस १९’च्या घरातील प्रवास संपला. अशनूर कौर, बसीर अली आणि झीशान हे तिघं नॉमिनेट झाले होते. मात्र, यापैकी झीशानचा प्रवास संपला.
शोमधून बाहेर पडल्यानंतर झीशानने ‘स्क्रीन’शी संवाद साधला आणि त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवासाबद्दल सांगितलं. त्यानं अमाल मलिक आणि बसीर अलीने विश्वासघात केल्याचा आणि शोदरम्यान निर्मात्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्याचा आरोप केला आहे.
झीशान म्हणाला, “मला अशा गोष्टींचं वाईट वाटत नाही. मी बाहेर पडलो ते ठीक आहे. मी पहिल्या आठवड्यातही बाहेर पडण्यास तयार होतो, त्यामुळे अशा गोष्टींमुळे मला काही त्रास होत नाही.”
पुढे झीशानने सहस्पर्धक गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि बसीर अली यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिल्या. तो म्हणाला, “गौरव खन्ना सुरुवातीच्या २-३ दिवसांत नेतृत्व घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला विरोध केला आणि त्यानंतर तो मागेच राहिला. आजही तसंच चालू आहे. माझ्याशी कोणी पंगा घेतला नाही.”
तो पुढे म्हणाला, “अमाल आणि बसीरकडून मला फारच दुखावल्यासारखं आणि त्यांनी विश्वासघात केल्यासारखं वाटलं. मी बाहेर आल्यावर कळलं की ते माझ्याबद्दल वाईट बोलले होते. जर मला हे आत असतानाच कळलं असतं तर परिस्थिती वेगळी असती. मी त्या गटाचा लीडर होतो; जो सर्वांना कायम एकत्र ठेवत होतो. मी त्यांना माझ्या लहान भावांसारखं वागवलं, पण आता समजलं की ते मला घाबरून होते.”
त्यानंतर झीशानने तान्या मित्तलचं कौतुक केलं. “तान्याबरोबर मला खूप चांगला वेळ घालवता आला. तिने माझी खूप काळजी घेतली आणि मीसुद्धा तिच्यासाठी वेळोवेळी उभा राहिलो. आमचं नातं शोच्या बाहेरही असंच टिकून राहील.”
झीशान कादरी इन्स्टाग्राम पोस्ट
शेवटी झीशानने असंही सांगितलं की, शोदरम्यान निर्मात्यांकडून त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. तो म्हणाला, “चौथ्या आठवड्यानंतर मला कोणतंही मार्गदर्शन मिळालं नाही. बाकी अनेक लोकांना अनेक सूचना दिल्या गेल्या. काहींना व्हिडीओही दाखवले गेले. मला वाटतं ही गोष्ट माझ्यासाठी थोडीशी अन्यायकारक होती.”