Bigg Boss Fame Ashnoor Kaur’s Parents Talks About Her Performance : अशनूर कौर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अशनूर सध्या ‘बिग बॉस १९’ च्या घरात झळकत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये ती वयाने सर्वांत लहान आहे; पण असे असतानाही तिने तिच्या गोड आणि समजूतदार स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अशनूर कौर ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने तिची शाळा घेतली, ज्यानंतर या शोचे मेकर्स व सलमान खान यांच्यावर प्रेक्षकांनी टीका केली आणि स्पर्धकांमध्ये भेदभाव करण्याचा आरोपदेखील केला. अशातच आता अशनूरच्या आई-वडिलांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना लेकीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अशनूरच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
अशनूरचे वडील गुरमित सिंह यांनी सांगितलं, “आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या आईनं तिच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत आणि आम्ही दोघे कायम तिला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. मी शो बघतो तेव्हा मला दिसतं की, ती तेथील सगळ्यांशी खूप आदरानं वागते. तिचं स्वत:चं मत असतं आणि ती कधीही चुकीच्या शब्दांचा वापर करीत नाही.”
अशनूरची आई अवनीत कौर म्हणाल्या, “अशनूरला माहीत नव्हतं की, काही गोष्टींच्या बाबतीत फक्त ‘वीकेंड का वार’लाच चर्चा केली जाते. त्यामुळे तिला बसीरनं समजावल्यानंतर ही गोष्ट कळली. तेव्हाच तिनं कन्फेशन रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी सगळ्यात आश्चर्याची गोष्ट हीच आहे की, तिनं किती समजूतदारपणानं त्या परिस्थितीचा सामना केला. इंडस्ट्रीत ती गेली १५ वर्षं काम करीत आहे. तरीसुद्धा मी नेहमी तिच्याबरोबर असते. तिला मार्गदर्शन करते, पाठिंबा देते. मला आतापर्यंत असं वाटायचं की, कोणताही निर्णय घेण्याआधी तिला माझ्या सल्ल्याची गरज असते; पण आता तिनं सिद्ध केलं की, ती स्वतंत्र आहे.”
रात्रभर झोपले नाही अशनूरचे आई-वडील
अशनूरच्या आईने पुढे सांगितले की, “तिला जेव्हा जर बिग बॉस तुझ्या मोठ्या बाबांसारखे असते, तर तू त्यांच्याशी अशीच बोलली असतीस का, असं विचारण्यात आलं तेव्हा ती गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नव्हती. आई-वडील असल्या कारणाने हा वीकेंड का वार आमच्यासाठी खूपच कठीण होता. मी भावुक झाले आणि खूप रडले. त्यामुळे आम्हाला रात्रभर झोप आली नाही.”