Bigg Boss Khatron Ke Khiladi update: ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ हे दोन्ही रिअॅलिटी शो खूप लोकप्रिय आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. आतापर्यंत बिग बॉस हिंदीचे १८ सीझन पार पडले आहेत; तर खतरों के खिलाडी या शोचे १४ सीझन झाले आहेत.
‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ हे शो कलर्स वाहिनीवर का दिसणार नाहीत?
प्रेक्षक या बिग बॉस आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन्ही शोच्या पुढच्या सीझनची वाट पाहत असतानाच याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती ‘एंडेमोल इंडिया’ करते. आतापर्यंत हे शो ‘व्हायकॉम’ची मालकी असलेल्या कलर्स वाहिनी आणि जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळाले. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही शो इथून पुढे सोनी टीव्हीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याचे कारण एंडेमोल इंडिया आणि व्हायकॉम यांच्यात शोवरून काही मतभेद आहेत. त्यामुळे हे शो इथून पुढे सोनी टीव्हीवर प्रदर्शित होऊ शकतात.
कलर्स वाहिनीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर प्रॉडक्शन हाऊस आणि सोनी टीव्ही यांच्यामध्ये या शोबाबत बोलणे सुरू असून, त्यांच्यात अद्याप कोणताही करार झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
बिग बॉस हा शो सलमान खान होस्ट करतो. तर खतरों के खिलाडी हा शो प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करतो. सलमान खान व रोहित शेट्टी यांच्यामुळेदेखील या दोन्ही शोंना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. बिग बॉस या शोबद्दल बोलायचे, तर पडद्यावरील कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तसेच काही लोकप्रिय व्यक्ती या शोमध्ये सहभागी होताना दिसतात.
या शोमधील स्पर्धकांना काही ठरावीक कालावधीसाठी शोच्या आयोजकांनी ठरविलेल्या ठिकाणी राहावे लागते. तिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत नाही. त्यांना काही टास्क दिले जातात. कधी एकट्याने, तर कधी गटाने हे टास्क खेळावे लागतात. त्यामधून घरातील सदस्यांमध्ये गट पडतात, वादावादी होते. प्रेम-मैत्री पाहायला मिळते. या शोंचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. विशेष बाब म्हणजे २००६ ला बिग बॉसचा पहिला सीझन सोनी टीव्हीवर प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या सीझनपासून बिग बॉस हा शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होऊ लागला.
खतरों के खिलाडी या शोमध्येदेखील टीव्हीवर दिसणारे कलाकार सहभागी होताना दिसतात. त्यामध्ये त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात. प्राण्यांबरोबरही काही टास्क असतात, काही पाण्यातील, काही उंचीवरील असे वेगवेगळे टास्क स्पर्धकांना दिले जातात. त्या टास्कमध्ये स्पर्धक त्यांच्या भीतीवर मात करताना दिसतात. आता हे दोन्ही लोकप्रिय कार्यक्रम कोणत्या वाहिनीवर प्रदर्शित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.