Bigg Boss Marathi 5 चे पर्व पहिल्या दिवसापासून गाजताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात होणारी मोठी भांडणे ते घरात झालेले दोन गट, यापासून घरात नुकतीच झालेली वाइल्ड कार्ड एन्ट्री यामुळे या शोची सातत्याने चर्चा होताना दिसते. प्रेक्षक, कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक सोशल मीडियावर खेळाबद्दल आणि स्पर्धकांच्या वागण्याबद्दल व्यक्त होताना दिसतात. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्याला तिच्या कृत्याबद्दल जाब विचारल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
नुकताच रितेश देशमुखने आर्याला निक्कीला मारल्याप्रकरणी जाब विचारल्याचा प्रोमो समोर आला होता. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “आर्याला बाहेर काढले तर इथून पुढे बिग बॉस बघणार नाही” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “आर्याने चूक केली, परत दोन मारायला पाहिजे होत्या” असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिले, “बिग बॉस निक्कीच्या पायाखालचे पायपुसणे आहे, बॉयकॉट निक्कीचा बिग बॉस”, असे अनेकांनी लिहित राग व्यक्त केला आहे. तर एका नेटकऱ्याने लिहिले, “आज रितेश देशमुख यांना महाराष्ट्राचा खरा हिरो व्हायची संधी आहे. ते माणूस म्हणून खरंच हिरो आहेत की झिरो हे समजेल.”
आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले, “आर्याला जर शिक्षा होणार असेल तर अरबाजला दुप्पट शिक्षा झाली पाहिजे. त्याने जान्हवीचा हात ओढला, नंतर घाणेरड्या पद्धतीने पिरगळला, पंढरीनाथच्या अंगावर बसला, वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या एपिसोडमध्ये सूरजला मुद्दाम ढकलले होते. निक्कीसाठी विशेष नियम आहेत का? त्यांना वेळोवेळी संरक्षण दिलं जातं, समान न्याय हवा, अरबाजला दुप्पट शिक्षा व्हायलाच हवी.”
एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, “आर्या तू अपराधी वाटून घेऊ नकोस, तू काही चुकीचं नाही केलंस, उलट तू दाखवून दिलं की जो कोणी आपल्या अंगावर हात टाकेल आणि बाप काढेल त्याच्या कानाखाली कशी द्यायची. तू जिजाऊची वाघीण शोभली. महाराष्ट्राचा तुला पाठिंबा आहे.” तर अनेक नेटकऱ्यांनी आर्या तू बरोबर आहेस, असे म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने कडक शब्दात आर्याला जाब विचारला होता. तिला जाब विचारताना म्हटले, “तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के हेतुपूर्वक केलं होतं. तर मी बिग बॉसला विनंती करतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा.”
कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये भांडण सुरू झाले होते. त्यावेळी आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर बिग बॉसने तात्पुरते जेलमध्ये टाकण्याची शिक्षा देत अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल असे म्हटले होते. आता आर्याला नेमकी काय शिक्षा होणार आणि आणखी कोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.