Abhijeet Khandkekar Talks About Priya Marathe : प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. आजवर तिने विविध माध्यमांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, कर्करोगाचं निदान झाल्यानं दुर्दैवानं प्रियाचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. इंडस्ट्रीतील लोकांबरोबर असलेल्या चांगल्या संबंधांमुळे आज ती हयात नसतानाही अनेक जण तिचं भरभरून कौतुक करताना दिसतात. तिचा मित्र व सहकलाकार अभिजीत खांडकेकरनंही तिच्याबद्दल तशीच प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिया मराठेनं ३१ ऑग्स्ट २०२५ रोजी जगाचा निरोप घेतला. कर्करोगाचं निदान झाल्यानंतरही प्रिया उपचार घेत असतानाही काम करीत होती. तिनं यादरम्यान मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनेत्रीनं तिच्या आजाराबद्दल फार कोणाला सांगितलं नव्हतं आणि ती खंबीरपणे समोर आलेल्या आव्हानाला सामोरं जातं होती. परंतु, तिची कर्करोगाशी असलेली झुंज अपयशी ठरली. अशातच आता तिचा जवळचा मित्र अभिजीतनं याबद्दल सांगत तिचं कौतुक केलं आहे.

प्रिया मराठेबद्दल अभिजीत खांडकेकरची प्रतिक्रिया

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतनं ती आजारपणादरम्यान खूप खंबीर होती आणि त्याचदरम्यान कामही करीत होती, असं सांगितलं आहे. यावेळी त्यानं प्रियाबरोबरच्या जुन्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत. अभिजीत म्हणाला, “गेल्या दीड वर्षापासून तिला हा आजार जडला होता आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर तिच्या घरचे सोडले, तर फार मोजक्या लोकांना याबद्दल माहिती होती आणि त्यापैकी मी एक होतो. आम्ही रोजचं काम एकत्र करायचो, इतके चांगले मित्र होतो. पण, इतक्या लवकर गोष्टी ढासळत जातील, तिची प्रकृती ढासळत जाईल आणि अशी एखादी बातमी येईल याची कल्पना असूनही मन नाही म्हणत होतं”.

अभिजीत पुढे म्हणाला, “आताही कितीही म्हटलं तरी अजूनही खरं नाही वाटत. कारण- अजूनही सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज करायला फोन हातात घेतो तेव्हा आजही प्रियाचं नाव टाईप करतो. कारण- तिच्या निधनाच्या आदल्या दिवशीच मी मेसेज केला होता. त्याच्या काही दिवस आधीही आमचं बोलणं झालं होतं. तेव्हा ती कोणालाही भेटायला तयार नव्हती. पण, तरीसुद्धा मी मित्र म्हणून हट्ट करून तिला मी फक्त भेटायला येतो तू काही बोलू नकोस, मला फक्त भेटू दे, असं म्हणत होतो.”

प्रियाबद्दल अभिजीत पुढे म्हणाला, “जे देवाच्या मनामध्ये असतं, ते होतं आणि त्याला कोणीच बदलू शकत नाही. त्यामुळे आता ती आपल्यामध्ये नाही हे मान्य करायला हवं. शंतनू आणि आम्ही तिचे सगळे जवळचे मित्र हा प्रयत्न करीत आहोत.” प्रियाबरोबरच्या आठवणींबद्दल अभिजीत पुढे म्हणाला, ” ‘तुझेच मी गीत गात आहे’दरम्यान आम्ही खूप चांगले मित्र झालो. पावणेदोन वर्ष एकत्र काम केलं. त्यानिमित्त एकत्र वेळ घालवणं, खायला जाणं खूप गप्पा मारणं असेल हे सगळं आम्ही एकत्र केलं. त्यामुळे तिला अशा परिस्थितीत पाहिलं तेव्हा हे सगळं खूप चटका लावणारं होतं”.

तिला दोन वाक्यही बोलता येत नव्हती – अभिजीत

प्रियाच्या आजारपणाबद्दल अभिजीत पुढे म्हणाला, “एका आजारपणाच्या निमित्तानं चेकअपदरम्यान काही गोष्टी समोर आल्या आणि त्या वेळेला तिनं पहिल्यांदा ती गोष्ट मला सांगितली. तेव्हा मी तिला दिलासा दिला होता. तेव्हा तिनं मला तिला आजारपणाबद्दल कोणालाही सांगायचं नाहीये याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर मग प्रयोग नसताना किंवा ती सारखी सारखी सुट्टी काय घेतेय, असं सेटवर जेव्हा लोकांना वाटायचं तेव्हा लपवाछपवी करावी लागायची. कारण- शंतनूनंतर मीच होतो, ज्याला याबद्दलची माहिती होती. त्यामुळे गोष्टी सावरून तिला मदत करणं, असा आमचा प्रयत्न होता. पण, नंतर ट्रीटमेंटमुळे तिची तब्येत वगैरे सगळं दिसून येत होतं. त्या वेळेला ती दोन नाटकं आणि मालिका करीत होती. तेव्हा ती ट्रीटमेंट घेण्याबरोबर कामही करीत होती; पण शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यं बोलता येत नव्हती.”