‘चला हवा येऊ द्या’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रेयाने महाराष्ट्रभरात दौरे केले. जवळपास ५० हजार लोकांसमोर न डगमगता स्किट सादर करणाऱ्या श्रेयाला प्रत्यक्षात ऑडिशनची प्रचंड भिती वाटते. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

एवढी लोकप्रियता मिळाल्यावर तू अजूनही ऑडिशन्स द्यायला जातेस का? असा प्रश्न श्रेया बुगडेला विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आयुष्यातील ही गंमत यापूर्वी मी कोणाला सांगितलेली नाही. ऑडिशनमध्ये मी कधीच चांगलं परफॉर्म केलेलं नाहीये. मला ऑडिशन देताना प्रचंड तणाव येतो आणि भिती वाटते. मला ५० हजार लोकांसमोर एखाद्या कार्यक्रमात अचानक सादरीकरण करायला सांगितलं, तर मला काहीच वाटणार नाही…मी खूप चांगलं परफॉर्म करेन. पण, या ऐवजी जर मला कोणी सांगितलं ऑडिशनला जा…तर आदल्या रात्रीपासून मला झोप लागत नाही.”

हेही वाचा : “महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल…”, जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट; म्हणाला, “आताच…”

श्रेया बुगडे पुढे म्हणाली, “सुरूवातीला मी अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. माझ्याबरोबर ऑडिशनला येणाऱ्या इतर मुली एकदम प्रोफेशनल असायच्या. कित्येकदा मी माझा नंबर यायच्या आधी ऑडिशनमधून पळून आले आहे. कॉलेजपासून ज्यांनी माझं काम पाहिलं होतं अशा दिग्दर्शकांमुळे मला ऑडिशन न देता काही कामं मिळाली.”

हेही वाचा : KBC 15: ‘वडिलांबाबत एवढंही माहीत नाही’, सुहाना खानचे उत्तर चुकल्यावर अमिताभ बच्चन यांची फिरकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी दिलेल्या ९९ टक्के ऑडिशन्समध्ये माझं सिलेक्शन झालेलं नाही. आता सेल्फ टेस्ट हा वेगळा प्रकार चालू झाला आहे. यामध्ये घरबसल्या आपण ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवायची असते. हे मला त्या मानाने सोयीस्कर जातं.” असं श्रेया बुगडेने सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेली १० वर्ष श्रेया ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.