मराठीतील प्रसिद्ध गायक संजू राठोडचं ‘एक नंबर, तुझी कंबर… हाय चाल शेकी शेकी’ हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संजूच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवरही या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. इन्स्टाग्रामवर तर हे गाणं सध्या बरंच ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर थिरकत आहेत. तसंच बरेच सेलिब्रिटीही संजूच्या या गाण्यावरच डान्स करत आहेत.
बॉलीवूडसह मराठी कलाकारही या गाण्यावर डान्स करत खास व्हिडीओ शेअर करत आहेत आणि या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मराठी मालिका विश्वातील अनेक अभिनेत्रींनी संजूच्या ‘शेकी शेकी’ गाण्यावरचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच कलर्स मराठीच्या ‘इंद्रायणी’ मालिकेतील नायिकांनी या गाण्यावर हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेतील अभिनेत्रींनी ‘शेकी शेकी’ गाण्यावरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री कांची शिंदे (इंदू), समृद्धी दांडगे (करिश्मा), सायली देशमुख (नारायणी), अपूर्वा चौधरी या अभिनेत्रींनी संजूच्या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स व्हिडीओ केला आहे. मालिकेत नुकतंच इंदूचं लग्न झालं आणि या लग्नानंतर आनंदात त्यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
‘इंद्रायणी’ मालिकेतील अभिनेत्रींच्या ‘शेकी शेकी’ गाण्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ‘सुंदर’, ‘मस्त’, ‘छान’, ‘भारी’ अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, इंद्रायणी’ मालिकेत नुकतंच इंदू आणि अधू यांचं लग्न पार पडलं. लग्नासाठी इंदूने खास मराठमोळा लूक केला होता.
नऊवारी साडी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये इंदू खूप सुंदर दिसत होती. डान्स व्हिडीओमध्येही ती या लूकमध्येच आहे. इंदू आणि अधू दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज या लग्नात दिसून आला. दोघांचं लग्न अगदी पारंपरिक पध्दतीने पार पडलं. होम, सप्तपदी आणि मंगलाष्टक अशा सगळ्या विधी या लग्नात पार पडल्या. अधूला इंदूची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.