Zee Marathi Awards 2025 : यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना भेटायला त्यांचे कुटुंबीय आले होते. प्राप्ती रेडकरची आजी, हर्षदा खानविलकर यांची बहीण, प्रसाद जवादेची आई, सासू आणि पत्नी तर, ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडची आई आणि मोठे भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

किरणने सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार जिंकल्यावर मंचावर त्याला एक गोड सरप्राइज मिळालं. त्याच्या आईने यावेळी लाडक्या लेकाचं औक्षण केलं. यानंतर, “किरण कायम खलनायकाची भूमिका साकारतो. त्यामुळे आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे तुम्हाला काही बोलतात का?” असा प्रश्न किरणच्या आईला विचारण्यात आला.

यावर किरण गायकवाडची आई म्हणाली, “लागिरं झालं जी’ सुरू होतं तेव्हा बायका मला शिव्या द्यायच्या. म्हणायच्या किरणची आई… तुमच्या मुलाला कसलं वळण लावलंय? बायकांना मारतो. याला तेव्हा मी घरातच घेतलं नव्हतं.” यावर किरण म्हणाला, “हो! हे खरंय तिने मला घरात नव्हतं घेतलं.”

अभिनेत्याची आई पुढे म्हणाली, “मी याला सांगितलं होतं… घरी येऊ नकोस तुझी भीती वाटते आणि असं सुद्धा विचारलं होतं की, ‘किरण तू असं का काम करतोस? मी तुझ्यावर असे संस्कार केले आहेत का? असलं काम करू नकोस.’ मग त्याने मला समजावलं की, हेच माझं काम आहे करावं लागतं. आता सगळे किरणची आई म्हणून ओळखतात त्यामुळे मला खूप भारी वाटतं.”

किरणच्या आईला अण्णा नाईकांसह करायचं आहे काम…

“मी काही शाळा शिकलेली नाही पण मला एखाद्या मालिकेत काम करायचं आहे. अण्णा नाईक यांच्याबरोबर काम करायचं आहे. खतरनाक खडूस काम करण्याची इच्छा आहे” असं किरणच्या आईने सांगितलं. यावर निर्मात्या श्वेता शिंदे यांनी “रोल फिक्स” म्हणत प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

किरण गायकवाड हा पुरस्कार जिंकल्यावर म्हणाला, “२०१७ पासून मी खलनायकाची भूमिका साकारतोय. त्यानंतर वाट्याला देवमाणूस मालिका आली. आता देवमाणूसचा हा तिसरा सीझन आहे आणि दरवर्षी मला हा पुरस्कार मिळाला आहे. आमच्या टीमला सुद्धा या पुरस्काराबद्दल खात्री होती. पण, एक गोष्ट आवर्जून सांगेन, ज्या खलनायकांना नामांकन मिळालं होतं ते सगळेच खूप ताकदीचे होते. थँक्यू सो मच. भावांनो हा सन्मान आपल्या सर्वांचा आहे.”