IPS Abhay Daga Success Story: अभिनय व फॅशनविश्वात पैसा व प्रसिद्धी दोन्ही आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळेच अनेकजण या क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहून मायानगरी मुंबईत येतात. एकदा या क्षेत्रात आल्यावर इथेच टिकून राहण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पण एक अभिनेता असा आहे, ज्याने एक मालिका केल्यावर अभिनयविश्व सोडले. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली आणि नंतर थेट आयपीएस अधिकारी झाला.

या अभिनेत्याचं नाव अभय राजेंद्र डागा. मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या अभयचे वडील डॉ. राजेंद्र आणि आई डॉ. मीना डागा हे महाराष्ट्रातील वर्धा येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत. वर्धा येथील बीव्हीबी लॉयड्स विद्या निकेतन स्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, अभय हैदराबादला गेला. तिथे त्याने शालेय शिक्षणाबरोबरच जेईई परीक्षेची तयारी केली. अभय डागाचा बी.टेक ते आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात.

अभिनयात आवड असल्याने केली मालिका

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आयआयटीमधून इंजिनिअरींग केल्यानंतर अभिनयाकडे वळले. अभय डागाची कहाणीही अशीच आहे. अभय डागाने २०१३ मध्ये जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळाला. आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना, अभिनय आणि नाट्यक्षेत्रात काम करायची आवड निर्माण झाल्याने त्याने या क्षेत्रात यायचं ठरवलं. २०१८ मध्ये, त्याने स्टार प्लसवरील लोकप्रिय टीव्ही शो ‘सिया के राम’ मध्ये शत्रुघ्नची भूमिका साकारली. त्यानंतर पुन्हा आयटी क्षेत्रात परत गेला आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं.

यूपीएससी परीक्षेसाठी सोडली नोकरी

टीव्ही इंडस्ट्री व मायक्रोसॉफ्टमधील करिअर सोडून अभय डागाने सर्वात मोठी रिस्क घेतली. त्याने २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्टची लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला दोन वर्षांनी मिळालं. २०२३ मध्ये तो १८५ रँक मिळवत यूपीएससी परीक्षा पास झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभय डागा झाला आयपीएस अधिकारी

चांगल्या पगाराची नोकरी, करिअर सोडून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या अनेक उमेदवारांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अभय डागा हे त्यापैकीच एक नाव. अभय ips.gov.in वेबसाइटवरील माहितीनुसार आयपीएस अभय राजेंद्र डागाचे होम स्टेट महाराष्ट्र असून त्यांना यूपी कॅडर मिळाले आहे.