Vijaya Babar shares experience of shooting first promo of Kamali: ‘कमळी’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका ३० जून २०२५ पासून प्रदर्शित होत आहे. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबरने कमळी ही भूमिका साकारली आहे.
“माझ्या भूमिकेतून प्रेक्षकांना काहीतरी…”
आता विजया बाबरने मालिकेतील कमळी ही भूमिका तिला कशी मिळाली, याबद्दल वक्तव्य केले आहे. ‘मराठी सीरियल्स ऑफिशिअल’शी साधलेल्या संवादात विजया म्हणाली, मला मोशन प्रॉडक्शन्समधून फोन आला होता. त्यांनी मला ऑडिशनचा व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. जेव्हा फोन आला तेव्हा मी जत्रेसाठी गावी गेले होते. आमच्या गावच्या देवीला बोलले होते की आता काहीतरी छान घडू दे. ही अतिशयोक्ती नाही. पण, ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी मला प्रॉडक्शनकडून फोन आला होता. “
“आमच्या गावातील घराच्या टेरेसवर जाऊन मी ऑडिशन शूट करून पाठवले. त्यानंतर जेव्हा मुंबईत आले तेव्हा लूक टेस्ट झाल्या. त्या लूकमध्ये पुन्हा ऑडिशन्स झाल्या. मला प्रेरणादायी भूमिका साकारायला खूप आवडते. माझ्या भूमिकेतून प्रेक्षकांना काहीतरी प्रेरणा मिळेल, ते त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जागरूक झाले तर मला त्याचा आनंद होईल.”
पुढे पहिल्या प्रोमोच्या शूटिंगचा अनुभव सांगत अभिनेत्री म्हणाली, “कमळीचा पहिला प्रोमो आम्ही वाईला शूट केला. सलग २२ तास आम्ही शूट केलं, पण खूप मज्जा आली. सर्व टीमचा उत्साह तितकाच होता. प्रवासाचं शूटिंग असल्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केले. बस वरचा सीन आम्ही भरउन्हात घाटावर शूट केला, दोन तास मी बसच्या टपावरच होते.”
अभिनेत्री पुढे असेही म्हणाली, “प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिला प्रोमो पाहिल्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं, तो प्रोमो खूप सुंदर शूट झाला आहे. पहिल्या प्रोमोमध्येच मालिकेला काय संदेश द्यायचा आहे, तोदेखील छान प्रकारे मांडला गेला आहे. कमळी एक अशी मुलगी आहे, जी शिक्षण घेण्यासाठी धडपड करत आहे. कोल्हापूरमधील सिद्धटेक गावातील कमळी आहे. त्या गावात मुलींची लहानपणीच लग्न होतात, त्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही. पण, कमळीला शिकून काहीतरी बनायचं आहे, त्यासाठी तिला मुंबईला जायचं आहे. त्यासाठी ती धडपड करत आहे.
आपण जेव्हा जिद्दीने एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्यासाठीच्या मेहनतीची पूर्ण तयारी करतो; तर अशी आहे कमळी. प्रेरणादायी, जिद्दी, बिंधास्त, सर्वांना आवडणारी आणि स्वप्नांसाठी लढणारी अशी आहे कमळी. मालिकेसाठी शूट करायला खूप मजा येते”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आता मालिकेत काय घडणार, कमळी शहरात शिक्षणासाठी कशी पोहोचणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.