Zee Marathi Serial Kamali : ‘कमळी’ आणि अनिका या दोघी कॉलेजमध्ये एकमेकींच्या विरोधात निवडणुका लढवणार असतात. अनिकाला स्वत:च्या हातात काहीही करून सत्ता हवी असते. यामुळेच ती एक मोठं कारस्थान रचते. यासाठी अनिका सगळ्यात आधी चरणशी हातमिळवणी करते. यानंतर कमळीच्या खोलीच्या चाव्या चोरल्या जातात.
आपल्या रूमच्या चाव्या हरवल्यात हे कमळीला वेळीच लक्षात येतं. इतक्यात निंगी तिला अनिकावरून सावध करते. तू इलेक्शन जिंकू नये यासाठी अनिका काहीही करू शकते असं ती कमळीला सांगते. यानंतर कमळी लगेच रूमच्या दिशेने जायला निघते. चरण हृषीच्या बहिणीच्या म्हणजेच प्राजूच्या ज्युसमध्ये ड्रग्ज मिक्स करून तिचा गैरफायदा घेणार असतो. पण, कमळी वेळीच खोलीजवळ पोहोचते आणि प्राजूचं रक्षण करते. यानंतर चरणला ती चांगलंच बदडते.
अनिका ठरल्यानुसार पोलिसांना घेऊन कमळीच्या खोलीत येते. याठिकाणी तिने आधीच ड्रग्जच्या पिशव्या लपवलेल्या असतात. निवडणुका जिंकण्यासाठी तू कॉलेजच्या मुलांना ड्रग्ज दिलंस असा आरोप तिच्यावर केला जातो आणि पोलीस कमळीला अटक करतात.
कमळी तुरुगांत गेल्यावर निंगी आपल्या मैत्रिणीला सोडवण्याचे अनेक प्रयत्न करते. तर, दुसरीकडे प्राजक्ता सगळी सत्य परिस्थिती हृषीला सांगते. तू काहीही करून कमळीला या सगळ्यातून मुक्त कर असंही ती मोठ्या भावाला सांगते. हृषीला वेळीच सत्य समजल्यामुळे तो आता या सगळ्या प्रकरणात कमळीची मदत करणार आहे.
कमळी चरणकडूनच प्राजूच्या ज्यूसमध्ये ड्रग्ज मिसळल्याचं सत्य वदवून घेणार आहे. “हो! प्राजूला ड्रग्ज मी दिले पण, तुझ्या खोलीत ड्रग्ज मी नाही अनिकाने ठेवले होते” अशी कबुली यावेळी चरण देतो. यानंतर तो कमळीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण, इतक्यात हृषी तिथे येतो आणि कमळीचं रक्षण करतो.
यानंतर नयनतारा निवडणुकीत विजेत्या ठरलेल्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यासाठी पुढे येते. यावेळी अनिका, रागिणी यांचे चेहरे पडतात. त्यांना कमळीचा भयंकर राग आलेला असतो. त्यामुळे ऐनवेळी इलेक्शनमध्ये कोण बाजी मारणार हे २२ आणि २३ ऑक्टोबरच्या भागात स्पष्ट होईल.
दरम्यान, अनिकाला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोच्या कमेंट्समध्ये दिल्या आहेत. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.