‘सोनी मराठी’ वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपूर्वी सुरू आहे. यामध्ये ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेचंही नाव आहे. अभिनेता हरीश दुधाडे, रुपल नंद, अश्विनी कासार, चंद्रलेखा जोशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मालिकेतील पोलीस निरीक्षक विजय भोसले म्हणजे अभिनेता हरीश दुधाडेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे.

अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस निरीक्षक विजय भोसलेच्या नावाच्या नेमप्लेटचा फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे. हरीशने लिहिलं आहे की, मायबाप. एक पर्व सुरू होतं, त्या प्रवासात आपण बरचं काही शिकतो, जगतो आणि मग ते पर्व संपतं. आज मी पोलीस निरीक्षक विजय भोसले म्हणून शेवटचा सीन केला. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलंत म्हणून सर्व प्रथम तुमचे आभार. सोनी मराठीचे आभार, तुम्ही मला ही संधी दिलीत आणि विश्वास दाखवलात. मनवा नाईक मनापासून आभार. ‘तु सौभाग्यवती हो’, ‘तुमची मुलगी काय करते’, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या सलग तीन मालिकांचा प्रवास आपण एकत्र केला. उत्तम निर्मात्यांशिवाय उत्तम निर्मिती कधीचं होऊ शकत नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस.

हेही वाचा – Video: संग्राम चौगुले ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…

पुढे अभिनेत्याने लिहिलं आहे, “चिन्मय मांडलेकर दादा मनापासून आभार. विजय भोसले जन्माला घालण्यापासून तर शेवटच्या सीनपर्यंत माझा हात धरून तू मला या वाटेवर घेऊन फिरलास. ७०० हून जास्त एपिसोड विजय भोसलेला तू प्रेमानं जपलंस आणि वाढवलंस. मुग्धा गोडबोले-रानडे मनापासून आभार कारण तू आहेस ते शब्द ज्यातून विजय भोसले व्यक्त झाला. ७०० हून अधिक एपिसोड तू तुझ्या प्रत्येक सीनमधून मला सप्राइज केलंस @mudebhimrao @amy_morai @rajesh_waradkar_22 @amol_suman_gaware, मनापासून आभार. विशेषतः भीम. भावा भोसले उभा करण्यात तुझा खूप मोलाचा वाटा आहे.”

“पडद्यामागच्या सगळ्या खऱ्या कलाकारांशिवाय विजय भोसले कायमच अपूर्ण आहे. माझे सर्व सहकलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वात महत्वाचे ते ज्यांचं आयुष्य मी गेली ३ वर्ष रोज जगलो ते म्हणजे मुंबई पोलीस तुमच्या शौर्याला, ताकदीला, रणनीतीला, कष्टांना मानाचा मुजरा. पोलीस निरीक्षक विजय भोसले साकारताना तुम्ही कायमच माझी प्रेरणा राहिलात. निरोप घेतो. आता भेटू . नव्या भूमिकेत. आर्शिवाद असू द्या. तुमचाच हरीश,” असं हरीशने लिहिलं आहे.

हेही वाचा – “‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा”, आर्याला घराबाहेर काढल्यामुळे लोकप्रिय अभिनेता भडकला, निषेध करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी मराठीवरील ‘ही’ मालिका देखील होणार ऑफ एअर

दरम्यान, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’सह ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील आणखी एक मालिका बंद होणार आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री एतशा संझगिरी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘निवेदिता माझी ताई’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट दाखवण्यात आली होती. पण आता मालिकेचा ४ ऑक्टोबरला शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप वाहिनीने याबाबत अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.