Kaun Banega Crorepati Ishit Bhatt Viral Video : सोशल मीडियाच्या या जमान्यात एखाद्या गोष्टीचं जितकं कौतुक होतं, तितकंच किंवा त्याहून अधिक लोक वाईटही बोलतात. कौतुकाची थाप देणारे नेटकरी एका छोट्याशा चुकीमुळे लगेच टीकाही करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये नुकत्याच एका भागात सहभागी झालेला इशित भट्ट. बिग बी अमितभ बच्चन यांच्याबरोबर केलेल्या वर्तनाबद्दल इशित सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
‘मला नियम वगैरे समजावत बसू नका’, ‘थेट प्रश्न विचारा’, ‘याचं उत्तर मला माहीत आहे’ अशा भाषेत त्यानं अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधल्याचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांतून व्हायरल होत आहेत. अवघ्या १० वर्षांच्या इशितच्या या वागण्याला ‘उर्मट’ म्हणत प्रचंड टीका केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी मंडळी इशितसह त्याच्या आई-वडिलांवरही टीका करीत आहेत.
इशितच्या उर्मट आणि उद्धट बोलण्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पा,हिले असतील. अशातच आता त्याची दुसरी बाजू दाखवणारा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओतून इशितचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये इशित बिग बींकडे त्याच्याबरोबर एक फोटो काढण्याची विनंती करताना दिसत आहे.
Trending Editz 1845 या सोशल मीडिया पेजद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये इशित भट बिग बींना म्हणतो, “सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुमचा वाढदिवस जवळ येतोय; पण मी इथून निघून जाईन. त्यामुळे मी तुमच्याबरोबर फोटो काढू शकत नाही. जर मी १२.५० लाखांपेक्षा जास्त रक्कम जिंकली, तरच माझ्याबरोबर तुम्ही फोटो काढाल, असं मला सांगण्यात आलंय. पण, त्याआधीच मी आऊट झालो, तर मी तुमच्याबरोबर फोटो काढू शकत नाही.”
त्यानंतर अमिताभ बच्चन त्याला म्हणतात, “असं काही नाही… तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच फोटो काढू शकता. अजिबात घाबरू नका.” पुढे अमिताभ बच्चन टीमला, “आधी यांच्याबरोबर माझा फोटो काढा”, असं सांगतात. नंतर ते इशितला म्हणतात, “तुम्ही बोलत होतात की, मी फोटो नाही काढणार; पण फोटो तर झाला.” इशितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यातून त्याचा प्रेमळ स्वभावही समोर आला आहे.
इशित भट्टचा व्हायरल व्हिडीओ
उर्मटपणाबद्दल टीका होत असतानाच इशितच्या या कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. इशितच नव्हें तर अमिताभ बच्चन यांच्या साधेपणाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. चिमकुल्या स्पर्धकाने फोटोसाठी विनंती करताच बिग बींना त्याला अगदी सहजपणे फोटो दिला. त्यांच्या याच स्वभावाचं नेटकरी कौतुक करीत आहेत.