Kaun Banega Crorepati 3 Year’s Old Ad Video Viral : १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण म्हणजे त्यानं अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती १७’ या शोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर केलेलं वर्तन. अनेक नेटकरी इशितच्या वागण्याला त्याला ‘उद्धट’ म्हणत आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियावर इशितवर टीका होत आहे. त्याच्या पालकत्वाबद्दल चर्चा होत आहेत.
अशातच ‘कौन बनेगा करोडपती’ची ३ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील मुलगा इशितसारखं वागत असल्याचं दाखवलेलं होतं. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीचे संवाद लेखक नीरज सिंह यांनीच हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओसह त्यांनी आपलं मतही व्यक्त केलं आहे.
या जाहिरातीत अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे होस्टच्या भूमिकेत दिसत असून ते एका लहान स्पर्धकाला प्रश्न विचारत आहेत. पण अमिताभ बच्चन आपला प्रश्न पूर्ण करायच्या आधीच तो लहान स्पर्धक म्हणतो, “मला उत्तर माहित आहे.” पुढे बिग बी त्याला थोडं थांबायला सांगतात, पण तो थेट “YOLO” (You Only Live Once) असं उत्तर देतो. या जाहिरातीच्या शेवटी अमिताभ बच्चन “वाय.जी.जे.एच.” म्हणजेच “ये गलत जवाब है” असं म्हणतात. हा प्रसंग पाहून अनेकांनी इशित भट्टच्या वागणुकीची आठवण व्यक्त केली आहे.
तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नीरज सिंह म्हणतात, “तीन वर्षांपूर्वी मी ‘कौन बनेगा करोडपती’साठी ही जाहिरात लिहिली होती आणि आज, १० वर्षांचा इशित भट्ट याच मंचावर उभा आहे आणि तो सगळं काही तसंच करत आहे, जे मी कधी एक २० वर्षाच्या मुलासाठी विचार केलं होतं. जगणं कल्पनेपेक्षा खूप विचित्र आणि वेगळं होत चाललंय. येणाऱ्या काळात पालकत्व ही आपल्या समाजासाठी सर्वात मोठी आणि कठीण जबाबदारी ठरणार आहे.”
‘कौन बनेगा करोडपती’ जाहिरात व्हिडीओ
दरम्यान, इशित भट्टनं या जुन्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणेच वागल्याचं नुकत्याच झालेल्या भागात पाहायला मिळालं. इशितनं केवळ अमिताभ बच्चन बोलत असताना व्यत्यय आणला असं नाही, तर त्यानं बिग बींना पूर्ण प्रश्न विचारूही दिला नाही. या वागण्यामुळे अनेकांनी इशितचं वर्तन उद्धट आणि असभ्य असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल त्याच्यावर टीका होत असतानाच अनेकांनी त्याला ट्रोल करणं चुकीचं असल्याचंही म्हटलंय.